

आष्टी : रंगांचा सण असलेल्या धूलिवंदनाच्या दिवशी आष्टी तालुक्यात ‘विकासाच्या धुळवडी’चा अनोखा रंग पहायला मिळाला. मतदारसंघातील शाश्वत विकास आणि विशेषतः ‘पाणी’ या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे हे दोन नेते एकत्र येत रणशिंग फुंकले आहे.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 3 मार्च) झालेल्या या बैठकीने मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
बैठकीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक घुमरे (पाटोदा), काकासाहेब शिंदे (आष्टी), माजी जि.प. सदस्य रामराव खेडकर, पराग आप्पासाहेब राख, पांडुरंग नागरगोजे, हनुमंत थोरवे, अशोक साळवे, नियामत बेग, अनिल जायभाये, सतीशमामा झगडे, दादा जगताप, माऊली वाघ, सुदाम झिंजूरके, हरिभाऊ जंजिरे, संजय विधाते, अंकुश मुंडे, संभाजी जगताप, बजरंग कर्डिले, नानाभाऊ वाडेकर, संजय चंदनशिव, सोपान गाडे, आबासाहेब तावरे, आदिनाथ गवळी, भागवत वारे, बबन सांगळे, बाळासाहेब शेकडे, विकास वनवे, गणेश सांगळे, आदेश निमोनकर, सचिन नालकोल, निलेश सोनवणे, सय्यद शहाबुद्दीन, चंद्रशेखर साके, संजय नालकोल, महारुद्र खेडकर, धोंडीबा सांगळे, सूर्यभान सांगळे, दीपक बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी भविष्यातील रोजगार संकटावर बोट ठेवले. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. भविष्यात ऊसतोडीसाठी हार्वेस्टर चा वापर वाढल्यास हजारो मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. पर्जन्यमान कमी असल्याने आपले तालुके दुष्काळी आहेत. त्यामुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण करून पाणी आणणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.सर्व संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पडल्यास न भूतो न भविष्यती अशी लोकचळवळ उभारली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एरवी वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेणारे हे दोन दिग्गज नेते मतदारसंघाच्या हितासाठी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक एकत्रित भूमिकेमुळे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय विलेषकांकडून व्यक्त केली जात आहे. बैठकीच्या शेवटी दोन्ही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून खऱ्या अर्थाने ‘विकासाचे धुलीवंदन’ साजरे केले.
माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी पाणीप्रश्नावर तांत्रिक मांडणी करत संभाव्य पर्याय सुचवले.जायकवाडी धरणामधून काही भागाला पाणी देणे, खुंटेफळ प्रकल्पातील 4 टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे तसेच सीना प्रकल्पच्या आवर्तनातून पाणी सोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.प्रशासकीय पातळीवर योग्य पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देताना, सत्तेत असलो तरी जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.