

कंधार ः तालुक्याच्या बाळांतवाडी हद्दीत अनेक समस्यांवर मात करीत आरोग्याच्या सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पूर्णत्वास आले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता, उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले आहे. सदर इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळपास चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, या ठिकाणी प्रशासन मंदगतीने काम करीत असल्याने कंधार उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
सदर उपजिल्हा रुग्णालयाला सुरुवातीला 50 खाटांची मंजुरी मिळाली होती. दरम्यान माजी आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नांनी रुग्णालयाचे रुपांतर 100 खाटांत करण्यात आले. रुग्णालयात नवीन पदे निर्माण झाली. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा जाणवत असून उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर थातूरमातूर उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविले जात आहे.
या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ, बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, दंत चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी अपघात, मेट्रन, पीएचएनसह अधिपरिचारिका, आहार तज्ज्ञ, रक्तपेढी तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण विभाग, इसीजी तंत्रज्ञ अद्ययावत आयसीयू, ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, रक्तपेढी, मेडिकल कॅम्प हॉल,ट्रामा केअर युनिट आदी विविध पदांचा समावेश आहे.
भविष्यात कंधार तालुक्यातील विविध रोगांवर उपचार कंधारमध्येच होणार असून सद्यस्थितीत या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असले तरी रुग्णांना सेवा कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालय व पानशेवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम एकदाच सुरू करण्यात आले होते. पानशेवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले. त्याचा शुभारंभही झाला. परंतु, जुने प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीमध्ये आजही स्थलांतरित झाले नाही. कारण रुग्णालयासाठी बसविण्यात आलेले विद्युत रोहित्र जळाले असून या विषयाकडे विद्युत विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.