
किनवट : बोधडी (बु.) येथील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका युवकाविरोधात ‘पोक्सो’ कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, ४ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडली.
पीडित मुलगी जिल्हा परिषद शाळेत दहावीत शिकत असून, शाळेकडे जात असताना आरोपी युवक यश चंद्रमणी कदम (रा. बोधडी बु., ता. किनवट) याने तिचा पाठलाग केला. त्याने तिच्याकडे अयोग्य हावभाव करत तिला त्रास दिला. पीडितेने प्रतिकार करत जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याने खिशातून चाकू काढून दाखवला आणि पीडितेचा हात ओढत इतर कोणाला काही सांगितलंस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, दि. ०५ जुलै २०२५ रोजी यश चंद्रमणी कदम (रा. बोधडी बु., ता. किनवट) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २१४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७९, ३५१(३) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे आणि पोउपनि सागर झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून, पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेमुळे ठळकपणे स्पष्ट झाली आहे.