

Attempted murder in Kinwat
किनवट : बसस्थानक मार्गावरील चिन्नावार हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधील गुरूदेव हेअर कटिंग सलूनमध्ये रविवारी (दि. 18 मे) रात्री 9.30 च्या सुमारास एका व्यक्तीने धारदार वस्तऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोन सलून कारागीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची जखम गंभीर स्वरूपाची आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, या घटनेने किनवट शहरात संतापाची लाट उसळली आहे.
हनुमानलू दिगंबरराव खासे (वय 35, रा. धोबीगल्ली, किनवट) यांनी सोमवारी (दि.19) दुपारी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी संदीप जाधव (रा. गंगानगर, किनवट) हा सलूनमध्ये आला. त्याने आधीच्या ग्राहकांपूर्वी स्वतःची दाढी करण्याची मागणी करत वाद घातला. वादाच्या दरम्यान, त्याने जातीवाचक शिवीगाळ करत दुकानातील वस्तरा उचलून हनुमानलू यांच्या गळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हनुमानलू यांनी वेळेवर तो वार चुकवल्यामुळे त्यांच्या डाव्या गालावर खोल जखम झाली.
दरम्यान, हनुमानलू यांना वाचवण्यासाठी पुढे आलेला दुसरा कारागीर राजेश भास्कर सूरजवाड याच्यावरही आरोपीने वस्तऱ्याने हल्ला करून, त्याच्या डाव्या दंडावर व कोपऱ्याच्या खाली गंभीर जखम केली. हल्ल्यानंतर संदीप जाधव शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर दोघांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठवले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आदिलाबाद येथील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. हनुमानलू खासे यांनी 19 मे रोजी किनवट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ किनवट शहरातील सर्व हेअर कटिंग सलून सोमवारी बंद ठेवण्यात आले. नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ किनवट शहरातील सर्व हेअर कटिंग सलून सोमवारी बंद ठेवण्यात आले. नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे सलून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस आरोपीचा शोध कसून करीत असून, या प्रकरणाची पुढील तपासणी पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे करीत आहेत.