

धर्माबाद : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत मानसिक व शारीरिक छळ सुरू करत माहेरहून घरबांधणीसाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप एका विवाहितेने केला. तिने पती, सासू-सासरे, दिर, नणंद तसेच काही नातेवाईकांविरुद्ध धर्माबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना जावेद खान पठाण (रा. कुंठागल्ली, धर्माबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. सना यांचा विवाह ऑक्टोबर २०२४ मध्ये धर्माबाद येथे मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला होता. विवाहावेळी वधूपक्षाकडून सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य तसेच मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती जावेद खान पठाण, सासरे यासीन खान पठाण, सासू खैसरी बेगम, दिर परवेज खान आणि नणंद शमशाद खानम यांनी विविध कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात केली. जेवण नीट बनवत नसल्याचा आरोप करत अपमानास्पद वागणूक देणे, उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचबरोबर घरबांधणीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी वारंवार मागणी करण्यात आली. पैसे आणले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर ऑगस्ट २०२५ मध्ये पतीने पत्नीला माहेरी आणून सोडल्याचा आरोप आहे.
दरम्यान, दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी समेटाचा प्रयत्न केला असता, सासरच्या मंडळींनी आपल्या काही नातेवाईकांना बोलावून घेत वाद घातला. पैसे मिळाल्याशिवाय मुलीला नांदवून घेणार नसल्याचे सांगत धमकावून घराबाहेर काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी धर्माबाद पोलिसांनी पती, सासरची मंडळी आणि त्यांच्या काही नातेवाईकांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संतोष कुमरे करीत आहेत.