

अंबड : 10 हजार रुपयांची मागणी करत ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन एका संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीच्या दांड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबड येथील सुरंगेनगर भागात घडली आहे.
या घटनेत पीडित महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या डोक्यात तब्बल 8 टाके पडले आहेत. क्रूरतेचा कळस म्हणजे, घरातून सुटका करून महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आली असता, पतीने पोलीस ठाण्याच्या आवारातच तिला पुन्हा गाठून बेदम मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरंगेनगर येथील रहिवासी मंदाकिनीबाई गिन्यानदेव भोसले (38, व्यवसाय-मजुरी) या 25 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपल्या घरी पती गिन्यानदेव याच्यासोबत होत्या. त्यावेळी पती गिन्यानदेव हरिभाऊ भोसले याने मंदाकिनीबाई यांच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. “पैसे दे, नाहीतर घरातील सर्व सामान फोडीन व तुला जिवे मारून टाकीन,“ अशी धमकी त्याने दिली.
मंदाकिनीबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, संतप्त झालेल्या गिन्यानदेवने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने घरातील टीव्ही, साऊंड सिस्टीम, कुलर, खुर्ची आणि इतर साहित्याची तोडफोड करून सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान केले. पतीला रोखण्यासाठी मंदाकिनीबाई पुढे सरसावल्या असता, त्याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर प्रहार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले.
या भयानक घटनेनंतर मंदाकिनीबाई यांनी कसातरी जीव वाचवला आणि आपला भाऊ पार्लेस पंडित काळे व बहीण नंदा यांच्यासह अंबड पोलीस ठाणे गाठले. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मंदाकिनीबाई यांची पतीच्या तावडीतून सुटका केली.
रक्तबंबाळ झालेल्या मंदापोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संतोष अप्पाराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुर्ले करत आहेत. या घटनेमुळे सुरंगेनगर परिसरात खळबळ उडाली आहे. नराधम पतीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिलेने पोलिस ठाणे प्रभारी यांच्याकडे केली आहे.
पोलिस ठाण्यातही पत्नीला शिवीगाळ
त्या पोलिस ठाण्यात बसलेल्या असताना, त्यांचा नराधम पती गिन्यानदेव तिथेही त्यांच्या पाळतीवर आला. “तू पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का आलीस?“ असे म्हणत त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच मंदाकिनीबाई यांना गाठून पुन्हा शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.