

नायगाव : तालुक्यातील धुप्पा येथील रहिवासी असलेले शिक्षक राजकुमार नागोराव धोंगडे (४२) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेची नोंद नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, शिक्षकाच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात तसेच धुप्पा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजकुमार धोंगडे हे नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, धोंगडे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी जीवन संपवले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. शिक्षकाच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यार्थी, पालक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली. रवींद्र प्राथमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्गातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.
शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार
उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकुमार धोंगडे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी धुप्पा (ता. नायगाव) येथे आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी नायगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, जीवन संपवण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.