

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः यंदाचा उन्हाळा संपून पावसाळ्याचे आगमन झाल्याची चाहूल मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येलाच मिळाली. या ऋतुबदलातच जिल्ह्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक हवापालटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गटागटाने रवाना झाले आहेत.
वरील मतदारसंघामध्ये पाच ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले; पण नांदेडमध्ये तिरंगी लढत होत असून नियोजन आणि इतर व्यवस्थांमध्ये भाजपा-महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी पूर्वानुभवाच्या बळावर आघाडी घेतली असल्याचे सांगण्यात आले.
नांदेडमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 452 असून पहिल्या पसंतीच्या मतांवर विजय प्राप्त करण्यासाठी 227 मतांची गरज आहे. भाजपाच्या राजूरकर यांनी तीनशेहून अधिक मतांचे नियोजन केले असून त्यातील बहुसंख्य नगरसेवकांना वेगवेगळ्या राज्यांत सहलीवर पाठविण्यात आले आहे. नांदेड मनपातील नगरसेवकांचा गट 10 तारखेला कोकणात जाण्याच्या तयारीत आहेत.
तब्बल 12 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या राजूरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे कृष्णा पाटील आष्टीकर हे अपक्ष उभे आहेत. या आघाडीत सर्वाधिक 92 मते काँग्रेसकडे असतानाही काँग्रेस उमेदवारास माघार घेण्यास भाग पाडून शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या मुलाला हट्टाने उभे केले. काँग्रेस पक्षातील अनेक नगरसेवकांना ही बाब खटकली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याचे दिसून आले. या पक्षाच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित आघाडीतर्फे प्रशांत इंगोले यांची उमेदवारी कायम असली, तरी राजकीय पातळीवर त्यांची दखल घेतली गेली नाही असे दिसून आले.
उमेदवार तसेच त्याच्या पक्षाच्या दृष्टीने स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक अत्यंत खर्चिक, उमेदवाराचा ताणतणाव वाढवणारी समजली जाते; पण या निवडणुकीमध्ये उमेदवार आणि पक्षास खर्चाचे तसेच झालेल्या खर्चाचे विवरण सादर करण्याचे बंधन नाही. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने जास्तीत जास्त मतांचे गणित जुळवण्यासाठी 18 तारखेपर्यंत मतदारांची बडदास्त ठेवण्यावर भर दिला आहे.