

नांदेड ः काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष मधुकर दिघे यांच्यानंतर देगलूरच्या तालुकाध्यक्ष श्वेता पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईमध्ये भेट घेऊन पक्षातील मनमानी नियुक्त्या आणि इतर विषयांवर चर्चा केली. या भेटीनंतर नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलाचे संकेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून मिळाले असल्याची माहिती श्वेता पाटील यांनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हणुमंत बेटमोगरेकर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून लोहा, देगलूर व इतर तालुकाध्यक्षांच्या परस्पर नियुक्त्या केल्या होत्या. यानंतर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी बेटमोगरेकर यांना खरमरीत पत्र लिहून जिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे अधिकार नाहीत, असे खडसावले होते.
त्यामुळे बेटमोगरेकर यांनी केलेल्या लोहा, उमरी देगलूर आणि नायगाव येथील काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या अखेर अवैध ठरल्या होत्या. तरीही लोहा काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर दिघे यांच्यानंतर जिल्ह्यातील एकमेव महिला तालुकाध्यक्ष असणाऱ्या देगलूरच्या श्वेता पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शनिवारी (दि.6 मार्च) मुंबईत भेट घेतली.
या भेटीत श्वेता पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील दक्षिण विभागात मनमानीपणे केलेल्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्यांची व इतर विषयांची माहिती सपकाळ यांना दिली. यानंतर एका महत्वपूर्ण पत्रातून काँग्रेस जिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्ष नियुक्तीचे अधिकार नाहीत, असे मी संबंधितांना कळविले असल्याचे सपकाळ यांनी श्वेता पाटील यांना सांगितले.
नांदेड जिल्ह्यात प्रदेश काँग्रेस लवकरच एक निरीक्षक पाठवून जिल्ह्यातील शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीत आवश्यक ते बदल करण्यासंदर्भात निर्णय घेतले जातील, असेही संकेत यावेळी सपकाळ यांनी दिले.
सपकाळ 9 मार्च रोजी हिंगोलीत!
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 09 मार्च रोजी कळमनुरी ते हिंगोली दरम्यान शेतकऱ्यांसाठी संघर्ष पदयात्रा आयोजित केली आहे. त्यामुळे ते उद्या सोमवार रोजी हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील उत्तर भागातून शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.