

औसा : नागपूर - रत्नागिरी महामार्गवरील औसा शहरानजीक एका हॉटेलजवळ शुक्रवार (दि.6 ) रात्री 11 च्या सुमारास वेगवान कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
धनराज काशिनाथ जाधव (49, सांगली), आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) अशी मृतांची नावे आहेत, तर गंभीर जखमीत जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) यांचा समावेश आहे. जखमींवर सध्या लातूर येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली येथील काशिनाथ जाधव हे आपल्या बीएमडब्ल्यू कारने (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आले होते. रात्री शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ते कारने औसा शहराकडे येत होते.
औशाकडे येत असताना शहराजवळ एका हॉटेल समोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्यात जावून पडली.
या भीषण विचित्र अपघातात बोरगावातील तिघांचा मृत्यू झाला. अपघात झाल्याचे आणि यात गावातील तीन जण मृत झाल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच बोरगाववर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात या तिघांवरही बोरगाव न येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी समयी प्रत्येकाचे डोळे पानावले होते.
रस्त्यावर रक्ताचा सडा
हा अपघात एवढा भयानक होता की, महामार्गावर अक्षरशः रक्ताचा सडा आणि मृताच्या अवयवांचा चेंदामेंदा झाला होता. ट्रकमधील लाकडे रस्त्यावर पडल्याने काही काळ या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. डीवायएसपी कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक रेवण डमाले, फौजदार भाऊसाहेब माळवदकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ पाहणी केली.