विशेष प्रतिनिधी - नांदेड :
खासगी वित्त कंपनीच्या सक्तीच्या कर्ज वसुलीमध्ये माळकौठा येथील तरुण शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा गूढ मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील धनदांडग्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना केली. दुसरीकडे सहकार विभागानेही अवैध सावकारी विरोधात धडक कारवाई आरंभिली आहे.
शिंदे यांच्या मृत्यूची घटना गेल्या शनिवारी उघड झाल्यानंतर जिल्हा तसेच पोलीस आणि सहकार प्रशासनाने कारवायांचे सत्र सुरू केले असून प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित खाजगी वित्तीय संस्थांचा गुंतागुंतीचा व्यवहार निदर्शनास आल्यानंतर पोलीस दलाच्या नांदेड शहर उपविभागाचे प्रमुख रामेश्वर व्यंजने यांच्या नेतृत्वाखाली १० जणांचे स्वतंत्र चौकशी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याचवेळी सहकार विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने नांदेड तालुक्यातील अवैध सावकारीविरोधात कारवाई केली.
शहराच्या मध्यवर्ती भागातील हिंगोली गेट रेल्वे उडाण पुलाखालील गुरूद्वारा बोर्डाच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये खालसा फायनान्सचा कारभार चालवला जात होता. या वित्तीय संस्थेशी संबंधितांनी गतवर्षी कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. हरप्रीतसिंघ नरेन्द्रसिंघ (मंटू) हे या संस्थेचे अध्यक्ष असून चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणातील आरोपींमध्ये त्यांचे नाव समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत केएफ इंटरप्रायजेस हेही एक नाव समोर आले. त्यातील काही व्यक्तींची नावेही निष्पन्न झाली असली, तरी एकंदर गुंतागुंत लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वतंत्र चौकशी पथकाची स्थापना केली.
चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह गेल्या शनिवारी केएफ इंटरप्रायजेस या फलकाखालील कार्यालयात आढळून आला होता. त्यांच्या पत्नी ज्योती यांनी नंतर दिलेल्या जबाबात खालसा फायनान्सचा संदर्भ आला होता. याच वित्तीय संस्थेच्या कार्यालयातून शिंदे कुटुंबाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्या गेला होता. त्यानंतर हरप्रीतसिंघ व त्यांच्या इतर साथीदारांनी स्थापन केलेल्या कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव समोर आले. या संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांची नावेही निष्पन्न झाली आहेत; पण पोलिसांकडून तूर्त हरप्रीतसिंघ नरेन्द्रसिंघ यांचा शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
चंद्रकांत शिंदे यांना त्यांच्या गावातून ताब्यात घेऊन नांदेडमध्ये आणणाऱ्यांची नावे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या इतर पथकांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतले असल्याची माहितीही मंगळवारी दुपारी प्राप्त झाली; पण काही बाबी पोलीस प्रशासनाने अद्याप उघड केलेल्या नाहीत.
दरम्यान नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील विना परवाना अवैध सावकारी संबंधी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकार व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तींच्या राहत्या घरात तसेच दुकानावर झडतीची कारवाई करून संशयास्पद हिशेब वह्या व कागदपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.
मान्यवरांची उपस्थिती !
हरप्रीतसिंघ नरेन्द्रसिंघ यांच्या अध्यक्षतेखालील कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना महाराष्ट्र सहकार कायद्याखाली झाल्यानंतर गतवर्षी १ नोव्हेंबर रोजी या पतसंस्थेचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनास जिल्हा प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते; पण हे दोघेही त्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते; पण सहकार खात्याचे एक अधिकारी तसेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती नोंदविली. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी तेथे केलेल्या भाषणाचा व्हीडीओदेखील समोर आला आहे