Nanded cash shortage : ऐन पेरणी अन्‌‍ लग्नसराईत बँकांमध्ये कॅशचा तुटवडा

दोन दिवस पुरेल इतकीच कॅश शिल्लक; 200 कोटींची मदत देण्याची मागणी
Nanded cash shortage
Nanded cash shortagepudhari
Published on
Updated on

नांदेड ः जिल्ह्यात एकीकडे कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता दुसरीकडे चलन टंचाईचा मोठा फटका बसू लागला आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि लग्नसराईच्या धामधुमीतच बँकांकडे खडखडाट असल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या () प्रादेशिक संचालकांना पत्र लिहून तातडीने चलन पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची शिवाजीनगर शाखा मुख्य करन्सी चेस्ट म्हणून काम करते. या चेस्टची क्षमता 450 कोटी रुपयांची आहे, मात्र सध्या तिथे अत्यंत तुटपुंजी रक्कम शिल्लक आहे. जिल्ह्याची दैनंदिन गरज पाहता ही रक्कम जेमतेम दोन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर विभागाकडून मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Nanded cash shortage
Nashik | मनपा लिपिकाने केला २४ लाखांचा अपहार

बळीराजा आणि सामान्यांची अडचण निर्माण झाली असून पेरणीवर संकट उभे राहिले आहे.मान्सूनपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करावे लागतात. ग्रामीण भागात आजही रोख व्यवहारांवर मोठा भर असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

डिजिटल व्यवहारांच्या मर्यादा

ग्रामीण भागात तांत्रिक अडचणींमुळे डिजिटल पेमेंट्समध्ये वारंवार अडथळे येत आहेत, परिणामी रोख रकमेचे महत्त्व वाढले आहे.

सात दिवसांचा बॅफर हवा

जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी पुढील सात दिवसांची गरज ओळखून किमान 200 कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली आहे. आता आरबीआय यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Nanded cash shortage
Thane News : भात खरेदीचे पैसे रखडले; शेतकरी होणार सोसायटी थकबाकीदार

लग्नाचा बस्ता खोळंबला

सद्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नासाठी वधू-वर पित्याची लगभग सुरू आहे. हॉलचे भाडे, केटरर्स आणि इतर खरेदीसाठी मोठी रक्कम लागते. बँकांमधून पैसे मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे लग्न बस्त्यासह इतर साहित्य खरेदी करण्याचे नियोजन कोलमडले आहे.

जिल्ह्यात सध्या पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी रोख रकमेची गरज आहे. दुसरीकडे लग्नसराईमुळे बँकांमध्ये गर्दी होत आहे. अशावेळी चलनाचा तुटवडा असणे ही गंभीर बाब आहे. आरबीआयने किमान 200 कोटी रुपये तातडीने पाठवावेत.“

अशोकराव चव्हाण, खासदार, नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news