

नाशिक : नाशिक पूर्व विभागात गांधीनगर उपकार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावरील मालमत्ता कर व पाणीपट्टी रोख भरणा केंद्रावर मनपाच्या लिपिकाने तब्बल २४ लाख २५ हजार ९४० रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ३० नोव्हेंबर २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा अपहार करण्यात आला आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखा परीक्षणाचा अहवाल सादर करीत हा अपहार उघड केला आहे.
दैनंदिन भरणा पास, भरणा चलान, बँकेत भरणा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बैंक भरणा स्लिप तसेच लेखा विभागाकडून डे-बुक, बँक विवरणपत्र (स्टेटमेंट), नागरी सुविधा केंदाकडून लेखा विभागास प्राप्त झालेल्या भरणा चलान याची तपासणी केली असता त्यात मोठी तफावत आढळून येत आहे. संगणकीय चलनावर नोंद असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टीच्या रोख रकमांचा भरणा बँकेत करताना प्रत्यक्षात जमा झालेल्या रोख रकमेपेक्षा कमी रकमांची नोंद दाखवून हा अपहार करण्यात आला आहे.
वास्तविक, महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता २०११ चे प्रकरण ७मधील नियम ९२ नुसार स्वीकारण्यात आलेली रक्कम दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी पूर्णपणे बँकेत भरणा करणे बंधनकारक आहे. मात्र, ३० नोव्हेंबर २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील प्राप्त झालेल्या एकूण ४६ लाख ४५ हजार ९९३ रुपयांपैकी २२ लाख २ हजार ५३ रुपये इतक्याच रकमेचा भरणार मनपाच्या बैंक खात्यात करण्यात आला आहे.
उर्वरित २४ लाख २५ हजार ९४० रुपयांचा लिपिक शशिकांत थोरात याने अपहार केला आहे. थोरात याने वारंवार जाणीवपूर्वक हा अपहार केला असून, थोरात याच्याकडून सदर रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी. तसेच २०१८ ते २०२२ या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. संबंधित दोषींवर प्रशासकीय करावाई करावी, तसेच बँक कर्मचारी व बँकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही बडगुजर यांनी केली.
यापूर्वीही अपहाराचे प्रकार उघडकीस
महापालिकेच्या कर भरणा केंद्रावर यापूर्वी देखील अपहाराचे प्रकार उघडकीस आले आहेत. नाशिकरोड विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब २०२२ मध्ये समोर आली होती. रकम भरणासाठी युनियन बँक आणि मनपाने संयुक्तरीत्या निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून हा अपहार केला होता. आता हे दुसरे प्रकरण समोर आल्याने, कुंपणच शेत खाते, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.