

Ardhapur Taluka Shelgav Bridge Overflow
अर्धापूर: तालुक्यातील 'शेलगाव'च्या मुख्य रस्त्याच्या पूलावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशीच गावचा संपर्क तुटला आहे. चालू पावसाळ्यात पुलावर पाणी येण्याची तिसरी वेळ असल्याने ग्रामस्थ हतबल झाले असून लोकप्रतिनिधी मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायला तयार नाहीत.
सन २००२ मध्ये शेलगावला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी भेट देऊन पूरग्रस्त शेलगाववासियांना दिलासा देण्याचे काम केले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे यांनी दिली. त्यावेळी काही अंशी गावचे पुनर्वसन आणि संबंधित रस्त्यावरील या पुलाचे बांधकामही करण्यात आले होते. परंतु मागच्या पाच सहा वर्षापासून पावसाळ्यात 'अतिवृष्टी' होताच या पूलावरून सातत्याने पाणी वाहत असल्याने गावचा अनेकदा संपर्क तुटला आहे. बाजूलाच असलेल्या स्मशानभूमीत सुद्धा या पुराचे पाणी स्थिरावत असते.
गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी येऊन शेलगावचा संपर्क तुटल्याने खा. अशोक चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण यांनी भेट देत संबंधित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पुन्हा या वर्षी पुलावर सातत्याने पाणी येत असल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. आता या भागात पाऊस न पडताच वरील भागात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीचे पाणी वाढल्याने शेलगावच्या पुलावर पाणी आले आहे. ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशीच गावचा संपर्क तुटल्याने अनेक बहिण भावांचीही ताटातूट झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. आत्माराम कपाटे यांनी दिली आहे.
गेली अनेक वर्षे अतिवृष्टी होताच पुलावर पाणी येऊन आमच्या गावचा वेळोवेळी संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी येतात खरे, परंतु त्यांचे आश्वासनही पुलाच्या पाण्याखालून वाहून जातात, ही अत्यंत दुर्दैवी व खेदजनक बाब आहे.
- आतम पाटील राजेगोरे, शेलगाव