पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी योजना : राधाकृष्ण विखे पाटील

Godavari basin water diversion- एमव्हीके कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे उद्घाटन! दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शासनाचे प्रयत्न; सिंचन प्रकल्पांना निधी देऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविणार
एमव्हीके कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे उद्घाटन
एमव्हीके कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे उद्घाटनPudhari photo
Published on: 
Updated on: 

नरेंद्र येरावार, उमरी

मनामध्ये जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असेल, तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर अल्पावधीत उभारलेला उद्योग समूह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शेतीला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

एमव्हीके कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे उद्घाटन
Nanded Crime | नांदेड : दोन घरफोड्यांचा उलगडा, एकास रंगेहाथ पकडले

उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या उद्योग समूहाच्या चार हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या विस्तारित साखर कारखाना प्रकल्पाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते.

एमव्हीके कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे उद्घाटन
Nanded Crime : नांदेड परिक्षेत्रात २२२ गुन्हे दाखल, ३.३१ कोटींचा ऐवज हस्तगत!

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता लक्षात न घेता केवळ मागणी करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी जलसाठ्याचे नियोजन, सिंचन प्रकल्पांची पूर्तता आणि पाण्याचा कार्यक्षम वापर या बाबींवर भर द्यावा लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील समुद्राकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या योजनेमुळे मराठवाड्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होऊ शकते. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. मात्र, मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिंचन प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी

नांदेड जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेच्या विकासासाठी विविध प्रकल्प आणि कालव्यांची कामे मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे. उमरी परिसरातील सिंचनाच्या प्रश्नांबाबत मारोतराव कवळे गुरुजी यांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख करताना संबंधित कामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच मन्याड धरणाच्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी १८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामालाही गती देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करणे, आवश्यक दुरुस्त्या करणे आणि पाणी वितरणाची व्यवस्था सुधारणे यांना प्राधान्य दिले जाईल. बळेगाव ते बाबळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीवरही कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

इसापूर धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पाच पाळी पाणी कालव्यात सोडले जाईल असै शेतकऱ्यांना हमी दिले. उपलब्ध जलसाठा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लेंडी प्रकल्पासह अन्य प्रलंबित सिंचन प्रकल्पांचाही प्रश्न महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शेतीपूरक उद्योगांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केवळ ऊस आणि साखर कारखानदारीवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. दूध उत्पादन, फळबागा आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शेतीमालावर प्रक्रिया करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.

चेअरमन मारोतराव कवळे यांनी या भागातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. मारोतराव कवळे गुरुजी यांनी गूळ पावडर निर्मितीपासून सुरुवात करून साखर उद्योगापर्यंत केलेला विस्तार कौतुकास्पद आहे. त्यांच्या उद्योग समूहामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी निर्माण होत आहे. नव्या विस्तारित प्रकल्पामुळे परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठवाड्याच्या विकासासाठी सिंचनाच्या सुविधा वाढविणे, शेतीला पूरक उद्योग उभारणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध झाल्यास शेतकरी शेतीचे योग्य नियोजन करू शकतात. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगांचा विस्तार झाल्यास शेतीमालाला अधिक चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सरकारच्या सिंचनविषयक योजना आणि उद्योजकांचे प्रयत्न यांचा समन्वय साधणे काळाची गरज असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

गुरुजी फाऊंडेशनच्यावतीने आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूबीयांना शिरी मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी खा. नितीन काका पाटील जाधव, खा. अजित गोपछडे, आ. हेमंत पाटील, आ. अमरनाथ राजूरकर, आ. जितेश अंतापूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. मोहन हंबर्डे, माजी आ. माधवराव पाटील जळगावकर, चैतन्य बापु देशमुख, मिलिंद पाटील जाधव, उत्कृष्ट पाटील जाधव, लक्ष्मीकांत नवघरे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, माधव पाटील कदम नगराध्यक्ष मुदखेड, विश्वनाथ पाटील बन्नाळीकर, दत्ता हरी पाटील चोळाखेकर, उद्धवराव पवार, शामराव पाटील टेकाळे, नांदेड जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर, गणपतराव पाटील हस्सेकर, अर्चनाताई राठोड, आरडी कवळे, नागभुषण वर्णी, लक्की पाटील हस्सेकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, अमोल ढगे, विक्रम देशमुख, बापुसाहेब कौडगावकर, आनंद चव्हाण, भगवान चव्हाण, दादाराव पाटील पळसगावकर, माधव कदम यांच्यासह पदाधिकारी, संत-महंत, सहकार, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्योग समूहाचे सीईओ संदीप पाटील कवळे, सौ. पूजा पाटील कवळे, सौ. सागरबाई कवळे, सौ. नेहाताई कवळे, सौ. अनिताताई जवळगावकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले. आभार विक्रम सोळंके यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news