

नायगाव : नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील देगाव पाटीजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण सुदैवाने बचावले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील टेम्पूर्णी येथील मीनाबाई नागनाथ कोकणे (वय ३२) या आपल्या नातेवाईकांसह दुचाकीवरून परसबाडी येथून नायगावकडे येत होत्या. त्याचवेळी नांदेडकडून नरसीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (क्र. डीएल-०१ आरजे-१८५५) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये मीनाबाई कोकणे या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले.
अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला. नायगाव येथील हेडगेवार चौकात कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देगाव बिटचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास देगाव बिट प्रमुख पोहेकॉ. मोहन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.