

Youth Killed Deglur Nanded Highway Accident
खानापूर : देगलूर-नांदेड महामार्गावर शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात आयशर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
या अपघातात शिवानंद केशव इंगळे (वय २५, रा. आदमपूर, ता. बिलोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुजित बालाजी भुरे (वय २०, रा. आदमपूर, ता. बिलोली) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी किरण पोपळघट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी त्वरित पोलिस निरीक्षकांना माहिती देत पोलिस पथक रवाना केले.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक हणमंत शिंदे, बीट जमादार अशोक घुमे, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डीडेवर आणि नामपल्ले वहोमगार्ड शुभम कोरेवार यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने SK ॲम्बुलन्सच्या सहाय्याने त्यांना विलंब न करता देगलूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातामुळे काही काळ देगलूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करत पुढील कार्यवाही सुरू केली