Nanded Accident : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; एक ठार, एक गंभीर

हिमायतनगर-भोकर महामार्गावरील घटना
Nanded Accident News
Nanded Accident News
Published on
Updated on

हिमायतनगर : हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे शनिवारी (दि. २५ जुलै) दुपारी १२ च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने जाणारी एमएच-२६-सीपी-८८६० क्रमांकाची कार सोनारी फाटा येथे भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टीएस-१८-जी-१८१७ व एमएच-२६-बीएस-५२६९ क्रमांकाच्या दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात सोनारी येथील शेख सोहेल शेख जहीर व शेख जिकरान शेख सिराज हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना सरसम येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात येत असताना शेख सोहेल शेख जहीर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख जिकरान शेख सिराज यांच्यावर नांदेड येथील ऐशोसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, बीट जमादार नागरगोजे, जमादार बालाजी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महामार्गावर गतीरोधकांची मागणी

हिमायतनगर-पोटा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही दोन जणांचा मृत्यू झाला होता. सोनारी, सरसम, पोटा व हिमायतनगर शहरालगतच्या फाट्यांवर गतीरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतीरोधक व इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news