

Mudkhed Taluka Education Zilla Parishad School
दिनेश शर्मा
मुदखेड : मुदखेड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला असून बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रांगणात खेळण्यासाठी मोकळे सोडून शिक्षक मोबाईलवर व्यस्त राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकाराकडे मुदखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
मुदखेड पंचायत समिती कार्यक्षेत्रात ६ केंद्रांतर्गत प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शासनाचा लाखो रुपये पगार मिळतो. परंतु, या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जाबद्दल काहीही देणे घेणे नाही. परिणामी पालक, विद्यार्थ्यांचा कल हा खासगी इंग्रजी शाळांकडे वाढलेला दिसून येत असल्याचे वास्तव आहे.
मुदखेड तालुक्यात प्राथमिक शाळा ७७, माध्यमिक ४ शाळा असून एवढे ३५७ शिक्षक आहेत. बहुतांशी गावात जेवढे वर्ग, तेवढ्या शिक्षकांची नेमणूक आहे. परंतु अनेक शाळांचे शिक्षक हे फक्त दोन ते चार तास ड्युटी करून मध्यंतरानंतर शाळा सोडून फरार होत असल्याचे विघातक चित्र अनेक गावांतील शाळांमध्ये आढळून येते आहे. शासन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना लाखो रुपयांचे वेतन देत असताना केवळ तीन ते चार तास ड्युटी करून घरी परतत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर सोडले की? शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू झालाय, असा संताप पालक व्यक्त करत आहेत.
वासरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव व्यंकटराव ताटे आणि काही शिक्षक हे सव्हें करण्याच्या नावाखाली तसेच वरिष्ठ स्तरावर बैठक, मिटिंग असल्याचे सांगून स्वतःचे खासगी कामे पूर्ण करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती, सूचना न देता ते परस्पर शाळा सोडून फरार होतात, असा आरोप वासरी येथील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मोहन बस्वदे वासरीकर यांनी केला आहे.