राष्ट्रवादीशी युतीसाठी आ. हेमंत पाटील यांचा पुढाकार
MLA Hemant Patil's initiative for alliance with NCP
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीसाठी खा. अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला असताना, दुसरीकडे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचे पहिले पाऊल टाकले; पण याच पक्षाचे स्थानिक आमदार त्याबद्दल अनभिज्ञ दिसल्यामुळे शिव-सेनेतील बेबनाव समोर आला आहे.
मनपा निवडणुकीची प्रक्रिया पुढील मंगळवारपासून सुरू होत असून त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला टाळून भाजपाने शिवसे-नेसोबत युती करण्याची रणनीती निश्चित केली. उभय पक्षांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक बुधवारी दुपारी झाल्यानंतर त्यासंबंधीचे निवेदन भाजपाच्या प्रवक्त्याने जारी केले होते.
सेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या पक्षाच्या नांदेडमधील दोन विधानसभा सदस्यांना महत्त्व देतानाच या पक्षाचे विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांना बेदखल केल्याची बाब समोर आली. त्या मुद्यावर शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर आणि आनंद बोंढारकर या दोन आमदारांनी आक्षेप घेतला नसल्याचेही स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व खा. चव्हाण यांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील यांची गुरुवारी भेट आणि बैठक झाली. ही बैठक झाल्यानंतर आ. चिखलीकर यांनी आमच्या भेटीमध्ये मनपा निवडणुकीसाठी चर्चा झाल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना कोणासोबत युती करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी अत्यंत सकारात्मक वक्तव्य केले होते. 'राष्ट्रवादी'ला सोबत घेऊन युती करा, असे पक्षाकडून आम्हाला सांगण्यात आले नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यानंतर चिखलीकर-हेमंत पाटील यांच्या भेटीची माहिती बाहेर आली.

