

We will make provisions in the budget for the 'Lendi' project and also resolve the issues of those affected by the project.
मुखेड; पुढारी वृत्तसेवाः
मुखेड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असलेल्या लेंडी प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्नही निकाली काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १८) येथे दिली.
मुखेड नगर परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, आ. तुषार राठोड, आ. जितेश अंतापूरकर, अमर राजुरकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, पुष्पा पवार, गंगाधर राठोड आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचे प्रश्न आ. डॉ. तुषार राठोड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुटले आहेत. मुखेड शहराच्या विकासासाठी आतापर्यंत १४० कोटींचा निधी दिला आहे.
रेल्वेसाठी ५० टक्के वाटा उचलणार
बोधन-मुखेड-लातूर या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधीचा वाटा लवकरच दिला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.