Gharkul Yojana issue : आमदार साहेब आमचीही व्यथा जाणून घ्या; घरकुल लाभार्थ्यांनी फोडला टाहो
श्रीक्षेत्र माहूर ःकिनवट- माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी किनवट तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न घेऊन नुकतीच किनवट पंचायत समितीला भेट देऊन गटविकास अधिकारी यांचेकडून वास्तवस्थिती जाणून घेतली, एवढ्यावरच ते थांबले नाहीतर त्यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्याची त्यांना विनंती केली. त्याच धर्तीवर माहूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मागील तीन वर्षांपासून रखडलेले घरकुलाचे अनुदान मिळवून देणे कामी प्रयत्न करावे,अशी आग्रही मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मिळविण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनाने माहूर नगर पंचायतीला मान्यता प्राप्त तीन कंपन्यांची सिफारस केली होती, परंतु तत्कालीन नगराध्यक्ष व नगर प्रशासनाने एक बनावट कंपनी तयार केली, आणि त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात अनियमितता करून घरकुल लाभार्थ्यांच्या हिश्याचे दोन कोटी रुपये गिळंकृत केल्याची बाब मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून उघड झाली आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयाने उर्वरित निधी देण्याचे टाळले आहे, परिणामी उर्वरित अनुदान रखडल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
माहूर शहरात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 932 लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे. यापैकी 450 लाभार्थ्यांचे प्रत्येकी 20 हजार रुपयांचा शेवटचा हप्ता रखडला आहे. या संदर्भात आ.भीमराव केराम यांनी किनवटच्या धर्तीवर माहूर शहरातील लाभार्थ्यांचा प्रश्न धसास लावावा या मागणीने आता जोर धरला आहे.
दरम्यान, 450 लाभार्थ्यांचा वी हजार रूपयांचा शेवटचा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना शेवटच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाने वेळेत निधी पाठविला, परंतु भ्रष्टाचारामुळे तो लाभार्थ्यांना मिळाला नाही, पर्यायाने शासनाची नाहक बदनामी झाली तरीही आ. केराम त्यासंदर्भात आवक्षरसुद्धा उच्चारत नाहीत, याचेच आश्चर्य वाटते.
प्रभाकर विद्वान्स घरकुल लाभार्थी

