

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा सूर आळवत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अध्यक्षपद अडीच-अडीच वर्षे ठेवण्याच्या फॉर्मुल्यावर सकारात्मक झाले आहेत. हा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कळविला असून आता वरिष्ठ नेते याबाबत दोन दिवसांत निर्णय देणार असल्याचे वृत्त मुंबईतून खात्रीलायक सूत्रांनी दिले आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारराजाने एकाही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा कौल दिलेला नाही. काँग्रेस पक्षाने महापालिकेतील युती कायम ठेवून जिल्हा परिषदेतही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिंदे शिवसेनेने मोजक्याच ठिकाणी महायुती केली होती आणि आपापली ताकद असलेले बालेकिल्ले स्वतंत्र लढविले होते. मात्र मतदारांनी आपली ताकद दाखवून महायुतीला एकत्र येण्यास भाग पाडले आहे.
जिल्हा परिषदेत 23 जागा जिंकून काँग्रेस पक्ष मोठा ठरला असला तरी बहुमताची 30 ही मॅजिक फिगर गाठणे अशक्य झाले आहे. तर गत वेळी सत्तेत असलेली भाजपा निम्म्याने घसरून 18 वर आली आणि दुसरीकडे गतवेळी पाच संख्या असलेली राष्ट्रवादी काँग्रेस 12 वर पोचली आहे. शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले खाते खोलले.
भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांचे संख्याबळ 31 होत आहे. यांची महायुती झाली तर बहुमत होणार आहे. सोबतीला दोन्ही अपक्ष असू शकतील. जर महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. मात्र केंद्रात व राज्यात सत्तेत असलेली महायुती लातूर जिल्हा परिषदेतही एकत्र नांदेल, असे संकेत मिळत आहेत.
राज्याचे सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे व आमदार विक्रम काळे यांच्या समवेत भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार व अरविंद पाटील निलंगेकर यांची प्राथमिक बैठक झाली असून त्यामध्ये अध्यक्षपद अडीच-अडीच वर्षे घेण्यावर आणि सभापती पदांबाबतही न्यायाने विभागणी करण्यावर एकमत झाल्याची माहिती हाती आली आहे. हाच फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज मुंबईत वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे.
आता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते या फॉर्म्युल्यावर चर्चा करून अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेत दोन दिवसांत महायुती करण्याचे चित्र स्पष्ट होईल आणि भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता स्थापन होईल यात शंका नाही.