

Minister Gulabrao Patil's criticism of Ashok Chavan
विशेष प्रतिनिधी
नांदेड : शंकरराव चव्हाण यांनी जोपासलेल्या आणि अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मुदखेड शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते येत आहेत आणि टोलेबाजी-शेरेबाजी करून जात आहेत. शुक्रवारी मुदखेडमध्ये गेलेले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तेथील परिस्थिती पाहून 'कुबेराच्या घरातच भिकारपण' अशी खोचक टिप्पणी केली.
खा. चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील भोकर आणि मुदखेड या दोन्ही नगरपरिषदांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भाजपाला आव्हान दिले असून या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते मागील चार दिवसांत भोकर-मुदखेडला आवर्जून गेले. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुनील तटकरे, नवाब मलिक यांनी आपल्या सभांमध्ये चव्हाणांवर चौफेर टीका केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही टोलेबाजीमध्ये भर घातली.
गुलाबराव म्हणाले, सभेच्या निमित्ताने मुदखेड शहरात प्रवेश केल्यावर मला वाटलं नाही, की हे शहर आहे. प्रवेश करतानाच दिसलेली अस्वच्छता, गटारी, दुषित पाणी, रस्ते हे पाहून गेल्या ७०-७२ वर्षांत यांनी येथे काय केले? मुदखेडमध्ये पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून आगामी काळात या खात्याचा मंत्री या नात्याने मी चौकशी लावणार आहे. इथे चांगला दवाखाना नाही, क्रीडांगण नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या गावाची ही स्थिती असेल, तर तिचे वर्णन 'कुबेराच्या घरातच भिकारपण' असे म्हणावे लागेल.
आपल्या या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या क्रांतिकारी निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली. या राज्यात महिला भगिनींचा मान शिंदे यांनीच वाढविल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या निमित्ताने मुदखेडमध्ये भाजपाकडून सुरू असलेल्या दबावतंत्राचाही त्यांनी समाचार घेतला. निवडणुकीत तुम्ही पैसे वाटणार असाल, तर आमचे शिवसैनिक ते पैसे हिसकावून घेतील, असा इशारा त्यांनी चव्हाण यांना उद्देशून दिला. पोलीस प्रशासनाला तंबी देत निवडणूक निष्पक्ष पार पाडण्याचे आवाहन केले.
वरील सभेस आ. हेमंत पाटील, आ. आनंद बोंढारकर, जिल्हाप्रमुख विनय गिरडे, प्रल्हाद इंगोले, संजय कुन्हे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री माने यांना मुदखेडवासीयांनी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन या सभेत करण्यात आले.