

प्रशांत भागवत :
साहित्याच्या रुळांवरून डौलात आणि नादब्रह्मसारख्या तालात संपूर्ण महाराष्ट्रभर धावणारी ‘मिर्झा एक्स्प्रेस’ शुक्रवारी (दि. २८) पहाटे ६.३० वाजता तिच्या अंतिम ‘प्लॅटफॉर्म क्रमांक ६८’ वर शांतपणे थांबली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा या मातीतली ओल कवितेत मिसळत मराठी हृदयात स्थान मिळविणारे ज्येष्ठ कवी, विनोदी रसाचे तत्त्वज्ञ आणि वऱ्हाडी संस्कृतीचे दूत डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने साहित्यविश्वावर उदास छाया पसरली आहे.
डॉ. मिर्झा यांची साहित्य, विनोद आणि सामाजिक भाष्याची परंपरा तब्बल पाच दशकांपर्यंत महाराष्ट्रात घुमत राहिली. मंचावरील त्यांच्या खास खुमासदार सादरीकरणामुळे ते घराघरांत पोहोचले. ग्रामीण जीवन, शेती, सामाजिक विरोधाभास आणि मानवी नात्यांवरील त्यांचा नर्म विनोद रसिकांच्या मनात कायमचा कोरला गेला. त्यांचे २० काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून ‘मिर्झा एक्स्प्रेस’ ही त्यांची काव्यमैफल तब्बल सहा हजार वेळा रंगली—महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत, राजधानींच्या सभागृहांत आणि वऱ्हाडी बोली जिथे जिथे पोहोचली तिथे तिथे.
वयाच्या अकराव्या वर्षी सुरू झालेला त्यांचा साहित्यप्रवास आजवर निखळ विनोद, लोकसंस्कृती, भाषेचे सौंदर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम म्हणून ओळखला जातो. ‘जांगडबुत्ता’ हा शब्द त्यांनी लोकप्रिय करून भाषेच्या कोशातच एक नवा दिवा पेटविला होता. धनज माणिकवाडा या छोट्याशा गावातून उगवलेली ही काव्यप्रतिभा शुक्रवारी वयाच्या ६८व्या वर्षी कायमची थांबली. वऱ्हाडी बोलीचे सौंदर्य, तिचे खटके, तिची माती आणि तिची ममत्वाची धूळ राज्यभर पोहोचविण्याचे अभूतपूर्व काम त्यांनी केले
पेशाने डॉक्टर असूनही दवाखान्यापेक्षा कविता हाच त्यांचा खरा ‘धंदा’ ठरला आणि ‘मिर्झा एक्स्प्रेस’ नावाची मैफल जणू नित्याची झाली. त्यांच्या विनोदी कवितेत वेदनेचा दाब, शेतकऱ्यांचे दुःख, समाजव्यवस्थेचे विदारक वास्तव आणि माणुसकीची धूसर उजळणी असे सर्वच थर दिसत. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, शंकर बडे यांच्यानंतर वऱ्हाडी कवितेला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे सर्वात प्रभावी नाव म्हणजे डॉ. मिर्झा. ‘जांगडबुत्ता’, ‘धोतर गुतलं बोरीले’, ‘मिर्झा एक्स्प्रेस’ अशा मैफली आणि असंख्य संग्रहांनी त्यांनी वऱ्हाडी बोलीला प्रतिष्ठा दिली.
जात–धर्माच्या भिंती पुसून टाकणारा, सर्वधर्मीयांचा ताईत बनलेला हा माणूस विनोदात वेदना आणि वेदनेत आशेचा धागा अशी अनोखी भाषा अखेरपर्यंत बोलत राहिला. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी हशा, हुंकार, विचार आणि वऱ्हाडी भाषेचे तेज वाहून नेले. मंचावरील त्यांचा अतूट आत्मविश्वास आणि मनाला गवसणी घालणारी खुमासदार शैली जणू सर्वसामान्यांच्या श्वासाशीच जोडलेली. ‘जांगडबुत्ता’ ते ‘मिर्झाजी काहीन’ पर्यंत प्रत्येक रचना रसिकांच्या मनात घर करून बसली.
गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. पण त्यांच्या कवितांचा धडधडता ताल मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आठवणीत जिवंत होता जसा त्यांच्या वऱ्हाडी स्वभावाचा सहजपणाही. त्यांचे जाणे म्हणजे वऱ्हाडी बोलीच्या आकाशातून एक तेजस्वी ध्रुवतारा अदृश्य होणे.
शेती, माती, माणूस, समाज आणि धर्मभेदाच्या पलीकडे माणुसकीचा साधा धडा हे त्यांच्या शब्दांचे वारसदार आता रसिकच राहणार. धर्मभेदावर त्यांच्या रचनांमध्ये असलेली चिमूटभर टोचणी आणि प्रांजळ माणुसकी लोकांना विचार करायला लावणारी ठरली. त्यांची भाषा रांगडी, पण मनाला बिलगणारी जशी वऱ्हाडी मातीतली लालसर धूळ.
डॉ. मिर्झा यांच्या निधनाने वऱ्हाडी साहित्याला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वधर्मीय, सर्व भागातील रसिक, सहकारी कवी आणि साहित्यप्रेमी यांच्यातून श्रद्धांजलीची भावना उमटत आहे. डॉ. मिर्झांच्या निधनाने वऱ्हाडी साहित्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ढासळला आहे. ‘कवितेने मारलं, कवितेने तारलं’ म्हणत जगलेला हा लोककवी जगातून निघून गेला. ‘मिर्झा एक्स्प्रेस’ थांबली असली तरी तिचा आवाज, तिचे काव्य आणि तिच्या डब्यांमध्ये भरलेला हशा महाराष्ट्राच्या स्मरणात अखंड घुमत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.