

नांदेड ः दिवसेंदिवस उन्हाचे चटके अधिक तीव्र होत आहे. तहान भागविण्यासाठी लस्सी, ज्यूस यासारखे रेडी फूडला अधिक पसंती मिळत आहे. यात गरीबांचा माठही मागे नाही. उन्हाच्या उकाडा व काहिलीतून दिलासा मिळविण्यासाठी माठ खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांची पसंती असलेल्या माठाला यंदा भावही चांगला मिळत असल्याने माठ उत्पादकांची चांगली कमाई होत आहे.
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे ब्रीद आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी नागरिक ताक, लस्सी, ज्यूस, थंड पेेय (रेडीफूड) सारखे पदार्थ सेवन करतात. पण थंडगार पाणी आणि तेही थंडगार माठातील पाणी प्राशन करणे, हा अमृतासमान अनुभव आहे. उन्हाळ्यात यंदाही माठाला चांगली मागणी आहे. गतवर्षापेक्षा यंदा दुप्पट भाव मोजावा लागत असला तरी उन्हातून सुटका मिळविण्यासाठी माठ खरेदीकडे लोकांचा कल वाढलेला आहे.
सध्या सिडकोमधील गुरुवार बाजार परिसर, राज कॉर्नर, तरोडा नाका, जुना कौठा रामसेतू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर फाटा आदी ठिकाणी माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
अडचणी दूर करण्याची गरज
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक व्यावसायाला घसरण लागली आहे. त्यामुळे उपजिविकेचा प्रश्न सतावत आहे. हस्तकला असलेल्या या मडक्याच्या व्यवसायाला रस्त्याच्या कडेला आश्रय देण्याची गरज आहे, तरच आमचा व्यवसाय टिकेल, अशी अपेक्षा तीस वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात असलेल्या गंगाबाई आकूलवार यांनी पुढारीशी बोलतांना व्यक्त केली.
350-700 रुपयांपर्यंत चांगले माठ
बाजारात सर्व आकाराचे माठ उपलब्ध आहेत. त्यात साधारणतः दहा लिटरपासून ते 20 लिटर क्षमतेचे माठ पाहायला मिळतात. 400 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत विविध आकारातील व विविध क्षमतेचे माठ विक्रीसाठी शहराच्या विविध भागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.