

संजीव कुळकर्णी
नांदेड ः जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत रेटाव्हिया प्रा.लि. कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र हेलिप्लांट प्रकल्पासंबंधीच्या सामंजस्य कराराची घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली होती; पण राज्याचे उद्योगखाते सांभाळणारे मंत्री उदय सामंत हे या प्रकल्पाबाबत अनभिज्ञ आणि संभ्रमात असल्याचे त्यांच्याच वक्तव्यातून दोन दिवसांपूर्वी येथे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मंत्री सामंत गेल्या रविवारी नांदेडला आले होते. या दौऱ्यात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना वरील नियोजित प्रकल्पासंबंधी त्यांच्याकडे विचारणा झाली असता त्याबाबत मला संभ्रम असल्याचे तसेच हेलिकॉप्टरच्या सुट्या भागांच्या उत्पादनांचा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे नांदेडमध्ये आल्यावर मला कळाले, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर समोर आलेल्या अधिकृत माहितीतून सामंत यांनी नांदेडला येऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच खोटे पाडण्याचा ‘उद्योग’ केल्याचे मानले जात असून भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड मनपाच्या निवडणूक प्रचारामध्ये ‘नांदेडकरांनी कमळाची काळजी करावी, त्यानंतर पुढील पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही आठवड्यांनीच फडणवीस यांनी नांदेडमध्ये तब्बल 4 हजार 250 कोटी रूपये गुंतवणुकीचा प्रकल्प मार्गी लावतानाच या प्रकल्पासाठी होणाऱ्या सामंजस्य कराराची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी नंतर स्वागत केले, तर आ.राजेश पवार यांनी हा प्रकल्प आपल्या मतदारसंघातील कृष्णुर औद्योगिक वसाहतीत व्हावा, अशी मागणी विधानसभेमध्ये केली होती.
उद्योगमंत्री सामंत यांनी वरील प्रकल्पासंबंधी नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यास वृत्तवाहिन्यांवर ठळक प्रसिद्धी मिळाली. तसेच खा.अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्ष टीका केली. या पार्श्वभूमीवर आता वरील प्रकल्पासंबंधी मार्च महिन्यात विधानभवनातच झालेल्या सामंजस्य करारानंतरचे शासकीय यंत्रणेने 11 मार्च रोजी जारी केलेले छायाचित्र समोर आले असून त्या छायाचित्रात मुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंतही होते, असे दिसून आले. रेटाव्हिया प्रा.लि. कंपनीचे कार्यकारी संचालक पोथापु सुजीत रेड्डी, संचालक व्यंकट माणिक रेड्डी हेही त्यांच्यासोबत होते.
वरील कंपनीशी शासनाचा सामंजस्य करार झाल्यानंतर कंपनीचे एक पथक मार्च महिन्यातच नांदेडला आले होते. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णुर औद्योगिक वसाहतीला भेट देऊन या पथकाने प्रकल्पासाठीच्या जागेची पाहणीही केली होती. या पाहणीप्रसंगी नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या सहचारिणी पूनम पवार उपस्थित होत्या. त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींचे स्वागतही केले.
हा प्रकल्प कृष्णुर येथे उभारण्यासंंबंधीची पुढील प्रक्रिया महामंडळाच्या स्तरावर जारी असताना उद्योगमंत्र्यांनी नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. सामंत यांनी होऊ घातलेल्या हेलिप्लांट प्रकल्पासंबंधी नांदेडमध्ये केलेले वक्तव्य म्हणजे राज्याच्या कार्यक्षम मुख्यमंत्र्यांनाच खोटे पाडण्याचा अनाठायी उद्योग असल्याची घणाघाती प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी व्यक्त केली.
विमानतळासंबंधी चुकीचे वक्तव्य!
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र हेलिप्लांट प्रकल्पासंबंधीचे आपले अज्ञान, आपली अनभिज्ञता वार्ताहरांसमोर उघड केली. तसेच नांदेड विमानतळासंबंधी त्यांनी चुकीचे वक्तव्य केले. पूर्वी हे विमानतळ औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली होते. अलीकडच्या काळात हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले; पण सामंत यांनी हे विमानतळ आम्ही विमानतळ प्राधिकरणाला वापरण्यासाठी दिले आहे, असे चुकीचे वक्तव्य केले.