

Manikrao Thackeray: No single leader can develop an entire city
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेसची विचारसरणी आहे. कोणत्याही शहराचा विकास एक नेता करू शकत नाही, त्यामागे पक्षाचे आणि जनतेचे पाठबळ असते. नांदेड मनपावर काँग्रेसची सत्ता होती, पक्षाची ताकद होती, त्यामुळेच नांदेडचा विकास होऊ शकला, असे प्रतिपादन काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन जुना मोंढा येथील पक्ष कार्यालयात गुरुवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि भूमिका विषद केली. व्यासपीठावर खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, समन्वयक श्याम दरक, जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, रामदास पाटील, एकनाथ मोरे, केदार पाटील, वंचितचे फारुक अहेमद, प्रशांत इंगोले, अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, यशपाल भिंगे, श्याम कांबळे आदींची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, की नांदेडमध्ये ज्यांच्या हाती काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी शहराचा कोणताही विकास केलेला नाही. नागपूर, लातूर, संभाजीनगरसारख्या महानगराच्या तुलनेत नांदेड शहरात विकास कामे अथवा सुधारणा दिसून येत नाहीत. नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली, त्यांनी ती नीट पार पाडली नाही, अशी टीका त्यांनी खा. अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. काँग्रेसचा वचननामा म्हणजे नांदेडच्या विकासाचे वचन आहे. त्याची पूर्तता करण्यास पक्ष कटिबद्ध आहे.
शहराच्या विकासाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. सिडको हडको, तरोडा भागातील तसेच नवीन वस्त्यांमध्ये रस्त्यांची निर्मिती केली. पाणीपुरवठा व मलनिस्सारणाची कामे वेगाने सुरू करून ती पूर्णत्वास नेली. गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.
शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी विविध अभियान राबविले. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, शिवाय सिग्नल व्यस्थाही सक्षम केली. कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, वसंतराव नाईक, महात्मा बसवेश्वर आदी महापुरुषांच्या स्मारकांची उभारणी करतानाच राजमाता जिजाऊ सृष्टीचीही निर्मिती केल्याचा उल्लेख या वचननमाम्यात आहे.
पुढील पाच वर्षांत शहरात दर्जेदार रस्ते व ड्रेनेज, नागरिकांना अखंड व नियमित पाणीपुरवठा, वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल, नवीन वळण रस्त्यांची निर्मिती करून वाहतुकीची कोंडी सोडवली जाईल. नवीन विकसित भागात रस्ते, नाल्या, ड्रेनेज आणि वीज यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, बेघरांना घरे, कलावंत व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अद्ययावत नाट्यगृहाचीही उभारणी केलीर जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
यावेळी खा. रवींद्र चव्हाण, बेटमोगरेकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.