

वसंत कपाटे
श्रीक्षेत्र माहूरः मृगनक्षत्र सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, माहूर शहरासह संपूर्ण परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने जलस्रोतांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शहर व परिसरातील बहुतांश तलाव, कुंड आणि नाले पूर्णपणे कोरडे पडले असून तालुक्याला वेढा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदीलाही अद्याप एकदाही पूर आलेला नाही. पावसाने अशीच दड़ी मारली तर यंदाच्या उन्हाळ्यात माहूर तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहूर शहरालगत असलेले भोजंती तलाव वगळता मातृतीर्थ, गुंडवळ तलाव, खंडाखोरी तलाव, पांडवलेणी तलाव, वनक्षेत्रातील वनदेव तलाव, इंजाळा तलाव, ऋषीकृषी तलाव, दत्तमांजरी तलाव, वझरा तलाव, धामणधरा तलाव तसेच भानुतीर्थ, झंपटनाथ, फुलबावडी यांसारखी धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाची कुंडे आज पूर्णपणे कोरडी पडली आहेत.
या जलस्रोतांत पाण्याची वाढ नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय जंगलातून वाहणारा गरुडगंगा हा प्रमुख नाला तसेच परिसरातील इतर सर्व लहान-मोठे नालेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पाण्याच्या शोधात त्यांना मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. परिस्थितीत सुधारणा झाली तर वनविभागाला उचित उपाययोजना करावी लागणार आहे. दरवर्षी मृग नक्षत्रानंतर होणाऱ्या पावसामुळे तलाव आणि नाल्यांमध्ये पाणी साचते तसेच पैनगंगानदीला पूर येऊन भूजल पातळीत वाढ होते. मात्र यंदा अद्याप पैनगंगेला एकदाही पूर न आल्याने नदीपात्रही बहुतांश ठिकाणी कोरडेच आहे.
परिणामी विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांमध्येही भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढू लागली आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पाणीपुरवठा, शेती आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यास सुरुवात करावी, जलस्रोतांचे संवर्धन करावे तसेच वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. सर्वांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या असून, दमदार पावसाशिवाय माहूर तालुक्याची तहान भागणे कठीण असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.