

संजीव कुळकर्णी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये रुजलेली घराणेशाही ही प्रशासन व संबंधितांसाठी नवीन बाब नाही. बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांमध्येही अनेकांच्या हाती घराणेशाहीचा झेंडा फडकत आहे. पूर्वीच्या संचालकांपैकी कोणाचा पती तर, कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा किंवा मुलगी, कोणाची सून इथपासून ते भाऊ काका-मामींपर्यंत नातलगशाहीचा विस्तार झाला आहे. त्याचवेळी प्रस्थापितांच्या मांदियाळीत लिंगायत आणि आर्यवैश्य या मोठ्या समाजाच्या प्रतिनिधींना बँकेतून हद्दपार करण्याचा 'आदर्श उद्योग' या निवडणुकीत यशस्वी ठरला आहे.
जिल्हा बँकेच्या २३ संचालकांपैकी ११ संचालक दोन आठवड्यांपूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर १२ जणांची निवडणुकीद्वारे निवड झाली आहे. बँकेच्या मावळत्या संचालक मंडळातील पाच आणि पूर्वीच्या मंडळातील एक असे सहा माजी संचालक पुन्हा बंकित विराजमान झाले आहेत, तर १७ जण नव्याने बँकमध्ये दाखल होत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नवे संचालक बँकेवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मागील काळामध्ये या बँकेमध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलेले श्यामराव कदम यांच्यासह बापूराव पाटील आष्टीकर, बळवंतराव चव्हाण, गोविंदमामा राठोड, बाबासाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर इत्यादी माजी अध्यक्ष संचालकांच्या मुलांनी बँकेमध्ये प्रतिनिधित्व केले. या परंपरेचा नव्या संचालक मंडळात मोठा विस्तार झाला असून त्याचा फटका होतकरू कार्यकर्ते किंया ज्यांनी उत्तम पूर्वतयारी केली होती, त्यांना बसला. शिवराज होटाळकर, श्रावण भिलवंडे, गजानन पांपटवार ही त्यातील ठळक उदाहरणे.
१९९२ ते २०२६ या कालावधीतील संचालक मंडळामध्ये लिंगायत समाजाकडून हरिहरराव भोसीकर तर आर्यवैश्य समाजातून मोहन पाटील टाकळीकर यांनी बँकेवर सतत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या वारसांनी यंदाच्या निवडणुकीतून बँकेमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला; पण नेतृत्वाने तसेच निवडणुकीची सारी सूत्रे हलविणाऱ्या एका दुकलीने त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले आणि निर्णायक क्षणी या दोन्ही समाजांना डावलण्याचा 'प्रताप' आ. चिखलीकरांच्या साथीने केला, असे दिसून आले. यांची संचालकपदाची कारकीर्द पाजारीरी त्यामुळे भोसीकरांचे पुत्र शिवकुमार लक्षवेधी अल्पजीवी ठरली.
बँकेच्या नव्या संचालक मंडळात मावळते संचालक खा. रवींद्र चव्हाण यांचे काका श्रीनिवासराव चव्हाण तसेच त्यांच्या मामी व माजी संचालक हणमंतराव बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई बेटमोगरेकर यांचे झालेले आगमन निवडणूक काळात काँग्रेस पक्षात टीकेचा विषय बनले. श्रीनिवासराव हे नायगावच्या चव्हाण घराण्यातून बँकेवर येणारे चौथे प्रतिनिधी ठरले आहेत. आपले दोन प्रतिनिधी बिनविरोध आल्यानंतर खा. रवींद्र चव्हाण यांनी इतरांच्या मदतीने देगलूरमधून लिंगायत समाजाच्या श्वेता बस्वराज पाटील यांनाही निवडून आणण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला.
वरील दोन नव्या संचालकांसह माजी अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे, खासदार नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा, माजी अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र कैलास, माजी संचालिका सविता मुसळे यांचे पती रामचंद्र ऊर्फ चंदर, माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचे बंधू ज्ञानेश्वर, माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांचे पुत्र राजेंद्र, माजी अध्यक्ष गोविंद राठोड यांचे आमदार पुत्र डॉ. तुषार, भाजपाचे दिवंगत नेते संभाजी पवार यांच्या स्नुषा पूनम, उमरी तालुक्यातील जुने नेते गोविंदाय सिंथीकर यांची कन्या संगीता पाटील, माजी आमदार दिवंगत निवृत्तीराव पाटील यांचे पुत्र व माजी आमदार माधवराव पवार इत्यादींच्या रूपात बंकिमध्ये घराणेशाहीची परंपरा अधिक समृद्ध व व्यापक झाली असल्याचे बघायला मिळते.