

नांदेड :महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या परिषदांच्या माध्यमातून किमान दीड लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार होतील, असा अंदाज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
हिंगोली येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेसाठी जाण्यासाठी मंत्री उदय सामंत हे गुरुवार (दि. २७) रोजी नांदेड विमानतळावर आले होते. स्थानिक लोकांना उद्योग क्षेत्रात संधी मिळावी आणि नवीन उद्योग उभारणीसह विद्यमान उद्योगांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून गुंतवणूक परिषदांचे आयोजन केले जात आहे. पहिल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ९० हजार कोटींचे, तर मागील वर्षी एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. यंदा किमान दीड लाख कोटींचे करार होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातील औद्योगिक विकासाबाबत बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाहनउद्योगांचा उल्लेख केला. बजाज उद्योगानंतर या भागात मोठ्या वाहननिर्मिती कारखान्यांची उभारणी होत आहे. सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून, त्यांची कामे सुरू आहेत. येत्या दोन वर्षांत हे कारखाने सुरू होतील. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा संपूर्ण मराठवाड्याला होईल, असे सामंत म्हणाले.
राज्यात सध्या ऑपरेशन टायगर किंवा पक्षप्रवेशाची कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांना ध्वनिमुद्रित संभाषण दिल्याच्या आरोपावर बोलताना, ते म्हणाले जरांगे यांच्या मुलाखतीत आपल्याकडे आणि रामदास कदम यांच्याकडे सारखीच ध्वनिमुद्रित क्लिप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ती क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता असून, याचा तपास व्हावा, अशी भूमिका सामंत यांनी मांडली.
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाबाबत बोलताना तेथे वाद असल्याचे त्यांनी नाकारले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणात शेखर निकम हे एकमेव आमदार असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदारसंघ पुनर्रचनेचा निर्णय संसदेत होणार असून, शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यास केंद्र सरकार त्याचे स्वागत करेल, असेही ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणताही तणाव राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही सामंत यांनी केले. यावेळी आ. हेमंत पाटील, आ. आनंद बोंढारकर यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.