

बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गावाशी असलेली नाळ जपत सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही गावातील सर्वसामान्य कुटुंबांचा विसर न पडू देता त्यांनी गावातील मुर्लीच्या विवाहासाठी आर्थिक मदत देण्याचा उपक्रम सलग नऊ वर्षांपासून सुरू ठेवला आहे.
अभिजीत बांगर (अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका), बापू बांगर (पोलिस अधीक्षक, अमरावती) आणि नितीन बांगर (विक्रीकर उपायुक्त, पुणे) हे तिघेही आपल्या गावातील मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये मदत देतात. बुधवारी (दि. २६) बांगरवाडी येथील सतीश भीमराव कांबळे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त १५ हजार रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मोठे पद नव्हे, मोठे मन महत्त्वाचे !
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उच्चपदांवर पोहोचलेले अनेक अधिकारी शहरात स्थायिक झाल्यानंतर गावाशी असलेले नाते विसरतात. मात्र बांगरवाडीच्या या अधिकाऱ्यांनी गावच्या मातीचे ऋण जपण्याचा आदर्श घालून दिला आहे. विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी गरजू कुटुंबाला दिलेली मदत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याबरोबरच आर्थिक आधारही ठरत आहे.
इतर गावांतील अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा !
राज्यातील विविध गावांतील उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपल्या गावातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या विवाहासाठी तसेच आरोग्य व पाणीप्रश्नांसाठी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. बांगरवाडीतील हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून गावाशी असलेले ऋणानुबंध जपणारा आहे. पद मोठे असण्यापेक्षा मन मोठे असणे महत्त्वाचे, हे या तीन अधिकाऱ्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.