

लातूर : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांसमोर रोजगार, व्यवसाय आणि करिअरच्या अनेक संधींचे प्रश्न उभे राहतात. युवकांच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेऊन त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजयुमो सक्षम आहे. युवक आणि सरकारमधील दुवा म्हणून संघटना काम करेल, असे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
भाजयुमोच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’निमित्त लातूर येथील एमआयटी मेडिकल कॉलेज परिसरात जिल्हा युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाडिक यांनी विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधला.सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचन कमी होत असून चुकीच्या माहितीचा आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढत आहे.
स्पर्धेच्या युगातील तणावामुळे तरुण नैराश्याकडे जात आहेत. त्यामुळे तरुणांनी वाचनाची सवय जोपासावी, कुटुंबाचा आदर करावा आणि सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा, असे आवाहन महाडिक यांनी केले. तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावापासून युवकांनी दूर राहून सशक्त पिढी घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या क्षेत्रात प्रभावी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड यांनी युवकांची ऊर्जा देशहितासाठी वापरण्याचे आवाहन केले. जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या विकासासाठी तरुणांनी समाजकार्यात सक्रिय व्हावे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश कराड यांचा कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदेश महामंत्री सुदर्शन यादव, उपाध्यक्ष सौरभ चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष ओम धरणे, मयूर दौंडकर, अनिमेश कुलकर्णी यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. अमर चव्हाण यांनी आभार मानले.