

नांदेड ः लहान हे गाव स्वातंत्र्यसैनिकांची पार्श्वभूमी असलेले गाव. दारूबंदी नंतर आता गावातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लहान ग्रामपंचायतीने भोंगा व डीजे बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरपंच सदाशिवराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. असे असले, तरी लहानमध्ये काही वर्षांपूर्वी दारूबंदी झाली होती; परंतु आता गावात अवैध दारूचा महापूर असल्याने काही सुजाण नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
लहान येथील भोंगा व डीजेबंदीचा ठराव दि.23 मार्च (सोमवार) रोजीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या विषयाचे सूचक आनंदराव लोणे तर अनुमोदक उपसरपंच मेहबूब शेख होते. घेतलेल्या निर्णयानुसार, गावातील विविध मंदिरे, प्रार्थना स्थळे, मस्जिद आणि विहारावरील भोंगे उतरवण्यात येणार असून, त्यामुळे गावातील ध्वनीप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
गावात यापूर्वी राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, गणपती उत्सव, विवाह सोहळे तसेच विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त मोठ्या आवाजात डीजे वाजवले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता आणि ध्वनिप्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय सकारात्मक पाऊल मानला जात आहे.
ग्रामपंचायत ठरावानुसार, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केवळ लहान साऊंड सिस्टीम वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ठरावात देण्यात आला आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी गावात लागू करण्यात आलेली दारूबंदी प्रत्यक्षात अपयशी ठरल्याने, यावर कुठल्या कारवाई करण्यात आल्या आहेत ? असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुभाषराव लोणे यांनी नोंदविले आहे.
सध्या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने गावचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्याबद्दल गाव पुढारी आणि प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून मूग गिळून गप्प का आहे? असा संतप्त सवाल लोणे यांनी उपस्थित केला आहे.
“गावात भोंगा आणि डीजे बंदी केली, पण गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचे काय?” भोंगाबंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच अवैध दारू विक्रीही कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. तरच गावाला खऱ्या अर्थाने शिस्त लागेल आणि गावचे आरोग्य टिकून राहील.
बी. डी. देशमुख आदर्श शिक्षक, लहान.