RTE admission location issue : आरटीई प्रवेशाचा ‌‘लोकेशन‌’चा गोंधळ; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

शेकडो विद्यार्थी राहणार शिक्षणापासून वंचित; संतप्त पालक आंदोलनाच्या पवित्र्यात
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on
Updated on

अंबाजोगाई : राज्यातील आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‌’आरटीई‌’ योजनेचा बीड जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे.

अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील तब्बल 18 नामांकित शाळांचे गुगल मॅपवर लोकेशन चुकीचे असल्याने शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिक्षण विभागाच्या या ‌’भोंगळ‌’ कारभारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या अन्यायाविरोधात पालक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

RTE admission
Bajrang Sonawane : मराठवाड्यातील रेल्वे सुविधांत वाढ करा

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईतील अनेक मोठ्या शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष जागा एका ठिकाणी आणि ऑनलाइन पोर्टलवर दाखवण्यात आलेले लोकेशन दुसरीकडेच आहे. आरटीई अर्जासाठी रहिवासी पत्ता आणि शाळेचे अंतर यांचे गणित महत्त्वाचे असते. मात्र, लोकेशनमधील या तांत्रिक घोळामुळे पालकांना ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शाळाच उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून, ठराविक शाळांना आरटीई प्रवेशाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी शिक्षण विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का? असा सवाल सुजाण पालकांनी उपस्थित केला आहे.शिक्षण विभागाच्या या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत असून, पालकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

RTE admission
Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी धमक्यांचे फोन

या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‌’पुढारी‌’च्या प्रतिनिधीने अंबाजोगाई शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, अधिकारी मीटिंगमध्ये असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली. तर प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुंवर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारण्याचे सौजन्य दाखवले नाही. यावरून शिक्षण विभाग या विषयाबाबत किती ‌‘गंभीर‌’ आहे, हे स्पष्ट होते.

तक्रारीनंतरही विभाग ढिम्मच!

विशेष म्हणजे, हा गंभीर प्रकार दीड महिन्यापूर्वीच स्थानिक पालकांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांनी तत्काळ बीडच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे याबाबत अहवाल पाठवला. मात्र, महिना उलटूनही जिल्हा शिक्षण विभागाने यावर कोणतीही हालचाल केलेली नाही. आज, 23 मार्च रोजीही तीच चुकीची लोकेशन पोर्टलवर दिसत आहेत, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 मार्चपर्यंतच आहे. अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असतानाही प्रशासनाने दुरुस्ती न केल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

शिक्षण मंत्र्यांनी आरटीई प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले असले, तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळी आहे. जर 25 मार्चपूर्वी लोकेशन दुरुस्त झाले नाही, तर अंबाजोगाईतील शेकडो गरीब विद्यार्थी यावर्षी मोफत शिक्षणापासून मुकतील. त्यामुळे आता राज्य शासन आणि शिक्षण मंत्री या प्रकरणी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news