

Sanjay Joshi's visit to Nanded while maintaining simplicity!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाच्या अन्य नेत्यांच्या अलीकडच्या नांदेड दौऱ्याचा पक्षातील स्थानिक नेत्यांनी मोठा गाजावाजा केला. प्रसिद्धीचा झगमगाट आणि शाही भोजनामुळेही हा दौरा गाजला; पण याच पक्षात राष्ट्रीय संघटनमंत्री राहिलेले, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय जोशी यांची गुरुवार-शुक्रवार दरम्यानची नांदेड भेट साधेपणा जपत पार पडली.
दिल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या संजय जोशी यांचे नाव भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काही महिन्यांपासून चर्चेत असले, तरी त्यावरून भाजपामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संघाच्या वरिष्ठांनी त्यांचे नाव पुढे केले असले, तरी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री जोशी यांच्या नावाला अनुकूल नाहीत, असे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर संजय जोशी गुरुवारी दुपारी हैदराबादहून नांदेड जिल्ह्यामध्ये आले. त्यांनी प्रथम नायगाव तालुक्यातील रातोळी येथे भाजपाचे माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. दुपारचे साधे-सात्विक भोजन तेथेच घेतले. भाजपातील वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडी सोडून इतर विषयांवर चर्चा केली आणि मग या परिवाराचा निरोप घेऊन ते सायंकाळी नांदेडमध्ये आले.
विश्रामगृहात न थांबता शहराबाहेरच्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. सायंकाळी गुरुद्वारात दर्शन घेतले. संघातील काहींशी त्यांनी संवाद साधला. शुक्रवारी सकाळी ते माहूरला रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यातली ही सारी माहिती त्यांनी नांदेड सोडल्यानंतर बाहेर आली. नांदेड जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार आणि पाच आमदार आहेत; पण यांतील एकाचाही संजय जोशी यांच्याशी परिचय किंवा संपर्क नाही.
पदाधिकाऱ्यांपैकी कोणालाही त्यांची ओळख नाही. यांतील कोणालाही पूर्वकल्पना न देता जोशी नांदेडमध्ये आले आणि निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते परत गेले. माहूरच्या देवीच्या दर्शनासाठीच जोशी यांनी नांदेड दौरा आखला होता, असे त्यांच्या निकटवर्तीनी सांगितले. माहूरला जाताना संतोष वर्मा त्यांच्यासोबत होते. जोशी यांच्या माहूर भेटीची सूचना किनवटचे पक्षातील अन्यायग्रस्त ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर यांना आधीच देण्यात आली होती.
जोशी यांचे त्यांनी माहूरला येऊन स्वागत केले. देवीच्या दर्शनानंतर ते तेथूनच थेट संभाजीनगरला रवाना झाले. नांदेडमध्ये भाजपाची बॅनरबाजी सुरू आहे. पक्षातल्या संकेतानुसार विभागीय संघटनमंत्र्याने प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे, पण सध्या हे पद सांभाळणार्या कार्यकत्यनि सारे संकेत गुंडाळून टाकल्याची चर्चा पक्षामध्ये होत असून सुधाकर भोयर यांनी संजय जोशी यांच्याकडे मराठवाड्याच्या संघटनमंत्र्यांच्या कार्यशैलीबद्दल तक्रार केल्याचे सांगण्यात आले.