Kinwat Wet Drought : किनवटवर ‌‘ओल्या दुष्काळा‌’चे शिक्कामोर्तब खरिपाची अंतिम पैसेवारी 37 पैसे जाहीर

अतिवृष्टीने 56 हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; 51 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा आधार
Kinwat Wet Drought
किनवटवर ‌‘ओल्या दुष्काळा‌’चे शिक्कामोर्तब खरिपाची अंतिम पैसेवारी 37 पैसे जाहीरpudhari photo
Published on
Updated on

किनवट : किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटाची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तालुका प्रशासनाने खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 37 पैसे (37 टक्के) जाहीर केली आहे. नऊ महसूल मंडळांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्याने तालुक्यात ‌‘ओल्या दुष्काळा‌’वर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, दुष्काळ घोषित करण्याचा आणि शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तालुक्यातील 191 गावांसाठी ही पैसेवारी लागू असणार आहे. तालुक्याचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 81 हजार 74.78 हेक्टर असून, यापैकी खरीप हंगामात 79 हजार 141 हेक्टरवर पेरणी झाली होती. तर 2 हजार 228.78 हेक्टर क्षेत्र पडीक राहिले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

Kinwat Wet Drought
Nanded Municipal Election : नांदेड मनपा निवडणुकीवर ‌‘तिसऱ्या डोळ्या‌’ची नजर

यंदा किनवट तालुक्यावर वरूणराजा कोपला. तालुक्यात तब्बल 12 वेळा अतिवृष्टी झाली, तर विविध नऊ मंडळांत मिळून 43 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस, ढगफुटीसदृश्य सरी, अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे खरिपाचे होत्याचे नव्हते झाले.

पूरस्थिती आणि सततच्या पावसामुळे 56 हजार 634 हेक्टरवरील जिरायती पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका 176 गावांतील 51 हजार 488 शेतकऱ्यांना बसला आहे. तसा अहवाल तहसील प्रशासनाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

Kinwat Wet Drought
Balaji Gade : भाजप लुटारुंचा व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष

कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आणि ज्वारी या प्रमुख पिकांचे उत्पादन घटले आहे. पहिल्या नजर अंदाजात आणि सुधारित पैसेवारीतही 37 पैसे नोंदवले गेले होते, अंतिम पैसेवारीही त्याच पातळीवर राहिल्याने परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे.

अंतिम पैसेवारी का महत्त्वाची?

पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी येणे म्हणजे पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होणे. प्रशासनाने अंतिम पैसेवारी 37 पैसे जाहीर केल्याने आता शेतकऱ्यांना शासकीय सवलती, कर्ज पुनर्गठन, शिक्षण शुल्क माफी आणि थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम उत्पादकतेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news