Water level summer shortage : किनवट जलप्रकल्पांत 31.99 टक्के जलसाठा

दीड महिन्यात पाणीसाठ्यात 20 टक्के घट
Water level summer shortage
किनवट जलप्रकल्पांत 31.99 टक्के जलसाठाpudhari photo
Published on
Updated on

अरुण तम्मडवार

किनवट : मागील चार वर्षांपासून तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असल्याने, पावसाळ्यात सर्वच जलप्रकल्प तुडुंब भरून वाहत होते. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामासाठी पाणीपुरवठा करूनही, सध्या किनवट तालुक्यातील एकूण 21 जलप्रकल्पांमध्ये 31.99 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, तो समाधानकारक मानला जात आहे. त्यामुळे यंदाही पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, दीड महिन्यापूर्वी याच प्रकल्पांमध्ये 52.99 टक्के जलसाठा होता. यंदाच्या तीव्र उन्हामुळे या कालावधीत सरासरी सुमारे 20 टक्के पाणी बाष्पीभवनामुळे घटल्याचे दिसून येते.

किनवट तालुक्यात नागझरी, लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलाव, तसेच 13 लघु तलाव आणि 3 साठवण तलाव आहेत. पूर्वी तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1,240 मि.मी. होते; मात्र हवामान विभागाने दीर्घकालीन नोंदींच्या आधारे 2020 पासून ते 1,063.09 मि.मी. निश्चित केले आहे.

Water level summer shortage
Pune Water Supply: समाविष्ट गावांतील नागरिक टँकरच्या भरवशावर; पाणी योजनांची कामे रखडली

राज्य शासनाच्या पर्जन्यमान पोर्टलवरील नोंदीनुसार, मागील पावसाळ्यात 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अपेक्षित सरासरी पाऊस 1,026.58 मि.मी. असताना प्रत्यक्षात 1,538.60 मि.मी. इतका मुबलक पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या 149.88 टक्के पर्जन्याची नोंद झाली.

त्यामुळे बहुतांश जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. सध्या केवळ सिंदगी, नंदगाव, अंबाडी व सावरगाव या चार लघु प्रकल्पांतील पाणी तीव्र उन्हामुळे तसेच काही ठिकाणी गेटमधील बिघाड व गळतीमुळे जोत्याखाली गेले आहे. कुपटी व नंदगाव लघु तलावांमध्ये दीर्घकाळापासून तांत्रिक अडचणी असल्याने पाणी साठत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Water level summer shortage
Sambhajinagar News : नव्या २५०० च्या जलवाहिनीतून ढोरकीनपर्यंत पाणी दाखल

निराळा, लक्कडकोट व सिंदगी येथील साठवण तलावांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होत असून, या तलावांतील पाणी जनावरांच्या पिण्यासाठी तसेच स्थानिक वापरासाठी राखीव ठेवले जाते.

त्यामुळे या तिन्ही साठवण तलावांमध्ये सध्या 54.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच किनवट शहराच्या नळयोजनेसाठी नागझरी प्रकल्पातील 1.5 दशलक्ष घनमीटर पाणी उन्हाळ्यात राखीव ठेवले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

यासोबत तालुक्यात दोन उच्च पातळीचे बंधारे असून, मोहपूर बंधाऱ्यात 72.83 तर येंदा बंधाऱ्यात 46.94 टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. दरम्यान, यंदाच्या रब्बी हंगामात मध्यम प्रकल्पांतील उपलब्ध पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जलसाठा (दशलक्ष घनमीटर,कंसातील टक्केवारी)

नागझरी मध्यम प्रकल्प 2.114 (32.20), लोणी मध्यम प्रकल्प 1.282 (15.30), डोंगरगाव मध्यम प्रकल्प 4.063 (46.14), सिरपूर बृहत 1.216 (29.62), मांडवी बृहत 2.524 (49.10). लघु प्रकल्पांमध्ये कुपटी 0.040 (3.00), मूळझरा 0.562 (31.03), थारा 0.400 (46.35), निचपूर 0.240 (10.89), जलधारा 0.418 (22.40), सिंदगी जोत्याखाली, हुडी 0.348 (22.23), पिंपळगाव (कि.) 0.944 (43.56), नंदगाव जोत्याखाली, अंबाडी जोत्याखाली, दरसांगवी 0.567 (21.10), पिंपळगाव (भि.) 1.435 (62.90), सावरगाव जोत्याखाली. साठवण तलावांमध्ये निराळा 1.414 (62.51), सिंदगी 0.803 (34.70) व लक्कडकोट 1.279 (70.51) असा साठा नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news