

Water has reached Dhorkin through the new 2,500 mm pipeline
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जॅकवेलमधून मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्याची प्रक्रिया सलग चार दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी (दि. २५) दुपारी १२.३६ वाजता उपसा सुरू करून मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्यात आले. सहा तास हा पाणीपुरवठा सुरू ठेवत शेवटचा धनगाव येथील स्कोअर व्हॉल्व्ह बंद केला अन् सायंकाळी ६ वाजता पाणी ढोरकीनपर्यंत दाखल झाल्याने १२.५० किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळेल, अशी शक्यता आहे.
शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणले जाणार आहे. त्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या चाचणीला सलग चौथ्या दिवशीही यश आले आहे.
जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये यशस्वीरीत्या पाणी आले. त्यानंतर जॅकवेलमधून पंपाद्वारे पाण्याचा उपसाही यशस् वीरीत्या पूर्ण झाला. दोन्ही पंपाद्वारे हा उपसा करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी चार किलोमीरटरपर्यंत मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी आणण्यात आले. या पाणी उपशादरम्यान काही ठिकाणी व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद नसल्याने गळती अढळली.
त्याची पॅकिंग योग्यरीत्या करून घेण्यात आली. तसेच गेटच्या गळतीची दुरुस्ती करण्याचे आदेशही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला दिले होते. मात्र या दुरुस्तीला थोडा उशीर झाल्याने बुधवारी सकाळी ९ ऐवजी दुपारी १२.३६ वाजता पंप सुरू करून जलवाहिनीत पाणी घेण्यात आले.
काही ठिकाणी एक्स्पान्शन जॉइंटचे नटबोल्ट ढिले असल्याचे अढळले. ते तातडीने फिट करण्यात आले. त्यानंतर पुढे नेण्याची प्रक्रिया करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता हे पाणी जलवाहिनीतून ढोरकीनपर्यंत दाखल झाले. यशस्वीरीत्या पाणी आल्याने कंत्राटदार जीव्हीप-ीआरचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोगुलुथू यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
गावांना सतर्कतेचा इशारा
पैठण ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनीत पाणी भरून त्याची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे कारकीन, ढोरकीन, बिडकीन, चितेगावसह इतर गावांना ध्वनिक्षेपकावरून सतर्क राहण्याचा इशारा गावकऱ्यांना दिला जात आहे.
असे आले पाणी
जलवाहिनीतून पहिल्यांदा दुपारी १ वाजता पाणी संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत आले. त्यानंतर येथील स्कोर व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. त्यानंतर पाणी धनगावच्या दिशेने वळवण्यात आले. धनगावपर्यंत (८.९० किलो मीटर) दुपारी ३:५३ वाजता पाणी पोहोचले. संध्याकाळी ५:३५ वाजता धनगावचा स्कोर व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर पाणी धनगावहून सायंकाळी ६.३५ वाजता पाणी ढोरकीन येथील स्कोर व्हॉल्व्हमधून बाहेर पडले.