

किनवट : तापमानात वाढ होऊ लागल्याने आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता जाणवू शकते. त्यामुळे किनवट तालुक्यातील एकही गाव पेयजलापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करून विशेष कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार भीमराव केराम यांनी दिले.
पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या 134 ग्रामपंचायतींमधील गाव, वाडी व तांड्यांमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 09 ) श्री साईबाबा मंदिर, किनवट येथे सविस्तर आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील ही पहिलीच पाणीटंचाई आढावा बैठक ठरली. बैठकीत जानेवारी ते मार्च तसेच एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील संभाव्य परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
नुकत्याच रुजू झालेल्या गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता एफ. एल. बघेले यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखड्याची रूपरेषा मांडण्यात आली. टंचाई काळात हातपंप दुरुस्ती, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन हातपंप उभारणी, तात्पुरत्या पूरक नळ योजना, विहीर अधिग्रहण, इंधन व टँकर व्यवस्था याबाबत आवश्यक माहिती तातडीने संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत अनेक गावांतील हातपंप नादुरुस्त असल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण वाढत असल्याचे निदर्शनास आले. पंचायत समिती स्तरावर आवश्यक वाहन व मनुष्यबळ अद्याप उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्ती व तातडीच्या उपाययोजनांमध्ये अडथळे येत असल्याची बाब ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांनी मांडली.
मागील वर्षी पाणीटंचाई निवारणासाठी 99 विहिरी अधिग्रहणाकरिता 42 लाख 54 हजार रुपये आणि टँकरसाठी 3 लाख 99 हजार 338 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हास्तरावर करण्यात आली होती; मात्र तो निधी अद्याप प्राप्त न झाल्याने ग्रामपंचायतींना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली.
यावर आमदार भीमराव केराम यांनी पाणीटंचाई हा तालुक्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे नमूद करत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. अधिग्रहण व टँकरसाठीचा निधी तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हास्तरावर वैयक्तिक पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय, जबाबदारी व तत्परतेने कार्य केल्यास पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस माजी समाजकल्याण सभापती संजय राठोड, कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत्ता आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटना संघटक बाळू पवार, कपिल करेवाड, उपसभापती बालाजी अंकुरवाड, कक्ष अधिकारी अमोद टोनपे, अभियंता ए.पी.गोविंदवाड, हनुमंत अलदर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभियंता देशमुख यांनी केले, तर विस्तार अधिकारी वसंत वाघमारे यांनी आभार मानले. बैठकीचे संपूर्ण नियोजन पं.स.पाणीपुरवठा विभाग प्रमुख अंकुश राठोड यांनी केले.