Nanded Agriculture News : किनवटची खरीप नजरअंदाज पैसेवारी ४३ पैसे

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पैसेवारीचे महत्त्व बदलले; पीकहानीचे चित्र मात्र स्पष्ट
Nanded Agriculture News
Nanded Agriculture Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

किनवट : पावसातील दीर्घ खंड, असमान वितरण आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे किनवट तालुक्यातील खरीप हंगामाची नजरअंदाज पैसेवारी ४३ पैसे आली आहे. तालुक्यातील १९१ महसुली गावांमध्ये ३० सप्टेंबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली. राज्य शासनाने यापूर्वीच किनवटसह राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केल्याने यंदा या पैसेवारीतून दुष्काळ ठरण्यापेक्षा खरीप पिकांच्या प्रत्यक्ष स्थितीचे प्राथमिक चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

गत काही वर्षांत वार्षिक सरासरीच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस नोंदविणाऱ्या तालुक्यात यंदा पावसाचे वितरण मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील पिकांना तडाखा दिला, तर त्यानंतरच्या दीर्घ पावसाच्या खंडाने उर्वरित पिकांवर परिणाम झाला. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मूग, उडीद आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून कपाशीची वाढही खुंटल्याचे चित्र आहे.

Nanded Agriculture News
Nanded Water Scarcity : ‘सुधा'तील पाणी आता पिण्यासाठीच

तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १ हजार २६.५८ मि.मी. असून, यंदा आतापर्यंत ७७३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७५.३२ टक्के आहे. पावसाळ्यात विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीच्या घटना नोंदल्या गेल्या असल्या, तरी त्यानंतर पडलेल्या दीर्घ खंडामुळे पिकांना आवश्यक त्या टप्प्यावर पाणी मिळाले नाही. त्यामुळे पावसाची एकूण आकडेवारी आणि प्रत्यक्ष पीकस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून आली.

दरम्‍यान, सामान्यतः खरीप पिकांची नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम पैसेवारी या टप्प्यांतून उत्पादनस्थितीचा अंदाज घेतला जातो. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी ही कमी उत्पादनाचे निदर्शक मानली जाते. मात्र, यंदा राज्य शासनाने २६ सप्टेंबरलाच दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी १५ डिसेंबरच्या अंतिम पैसेवारीची प्रतीक्षा करण्याची परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे ४३ पैशांची नजरअंदाज पैसेवारी ही किनवट तालुक्यातील पीकहानीचे प्राथमिक प्रशासकीय चित्र म्हणून महत्त्वाची ठरते.

आता ३१ ऑक्टोबरला जाहीर होणारी सुधारित आणि १५ डिसेंबरला अपेक्षित अंतिम पैसेवारी पिकांच्या स्थितीत झालेला बदल अधिक स्पष्ट करू शकते. विशेषतः पीक कापणी प्रयोगातून प्रत्यक्ष उत्पादनाचा अंदाज घेतला जाणार असल्याने, अंतिम पैसेवारीला उत्पादनातील घट नोंदविण्याच्या दृष्टीने महत्त्व राहणार आहे. मात्र, दुष्काळी सवलतींची पात्रता ठरविण्यासाठी यंदा अंतिम पैसेवारीची प्रतीक्षा मात्र करावी लागणार नाही.

Nanded Agriculture News
Latur News : सीईआयआरच्या मदतीने ५१ हरवलेले मोबाईल शोधले

किनवट तालुक्यात लागवडीसाठी लायक ८० हजार ६९३.९५ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा ७९ हजार ९७५.५० हेक्टरवर खरीप पेरणी झाली असून ७१८.४५ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर ४३ पैशांची पैसेवारी ही तालुक्यातील खरीप हंगामाच्या आर्थिक नुकसानीचे प्राथमिक संकेत देणारी ठरली आहे.

सवलती आणि मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाने कर्ज पुनर्गठन, जमीन महसूल वसुलीवरील सवलत, कृषीपंपांच्या वीजबिलासंबंधी सवलती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शिक्षण शुल्कामध्ये माफी, पाणीपुरवठ्याचे नियोजन तसेच रोजगार हमीच्या कामांना चालना देण्यासारख्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पीकहानीच्या सर्वेक्षणानंतर पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे किनवटच्या शेतकऱ्यांचे आता ४३ पैशांच्या पैसेवारीपेक्षा प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे, पीकहानीची नोंद आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या अंमलबजावणीकडे अधिक लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news