Nanded Water Scarcity : ‘सुधा'तील पाणी आता पिण्यासाठीच

उन्‍हाळ्यात होणारी भीषण टंचाई लक्षात घेता प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव
Nanded Water Scarcity
Nanded Water Scarcitypudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकर: ‘एल निनो’ मुळे यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुधा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.

‘एल निनो’ मुळे पावसाचे प्रमाण अल्प राहिले. परती चा पाऊस पडण्याची शक्यता कमी दिसत असून तलावातील उपलब्ध जलसाठा राखीव करणे आवश्यक होते. भोकर तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून समजल्या जाणाऱ्या सुधा प्रकल्पातून भोकर शहर व इतर चार गावांना पाणी पुरवठा होतो. यासाठी दरवर्षी २.०५ दक्षलक्षघणमीटर पाणी आरक्षित करण्यात येते.

Nanded Water Scarcity
Nanded Earthquake : नांदेडला भूकंपाचे सौम्य धक्के!

सध्या या प्रकल्पात ५०.७९ टक्के म्हणजे ३.७७ दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे. सुधा तील उपलब्ध पाणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केले आहे. यापुढे पुढच्या वर्षी पर्यंत हे पाणी शेतीसाठी वापरता येणार नाही. मागील अनेक वर्षापासून भोकर तालुक्याच्या नशिबी पाणी टंचाई पाचवीला पुजली आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवा यासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून घर तिथे नळ कनेक्शन देण्याची कामाला सुरुवात झाली असताना यास ग्रीड योजनेची साथ मिळाली.

एका माणसाला दरदिवशी ५५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गावाला ग्रीड योजनेतून पाणी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोड स्वप्न मागील पाच वर्षापूर्वी दाखविले गेले. पण हि योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी विलंब केला जात आहे. निधी रखडला गेला असल्यानेच सध्या ही योजना व्हेंटिलेटरवर आहे.

Nanded Water Scarcity
Dharashiv Water Crisis : सिना धरणात उरला केवळ १.४० टीएमसी पाणीसाठा

सदरील योजनेचा निधी रखडला असल्याने संबंधित गुत्तेदार पुढचे काम करायला तयार होत नसल्याचे चित्र दिसत आहे. ग्रीड योजनेचा शुद्ध पाणी यावर्षीच्या उन्हाळ्यात मिळत नाही. शुद्ध पाणी नाही तर नाही अशुद्ध पाणी तरी उपलब्ध होणे आवश्यक होते. पण, ग्रीड योजनेमुळे जलजीवन योजनेमधून विहिरी रद्द करण्यात आल्या असल्याने गावातील नळे पाण्याविना ओस पडले आहेत.

हिवरे बाजारचा आदर्श घेणे आवश्यक....

हिवरे बाजारात दरवर्षी १ मे ला महाराष्ट्र दिन, २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि नवरात्रीच्या सातव्या माळेला पाण्याचा अधिकृत ताळेबंद गावकऱ्यांसमोर मांडला जातो. गावात वर्षभरात एकूण किती पाऊस पडला. भूगर्भातील पाणी पातळी आणि पुढील वर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि गुराढोरांसाठी किती पाणी उपलब्ध राहील, याचा अचूक हिशोब या पाण्याच्या ताळेबंदातून मांडला जातो. असाच ताळेबंद सगळ्या गावांनी तयार केला तर पाणी टंचाईचा बाऊ होत नाही. यामुळे हिवरे बाजारचा आदर्श घेणे आवश्यक आहे.

पैशावरचे मतदान आणि रखडलेली कामे...

मागील काही वर्षांपासून भोकर तालुक्यातील निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. मतदार ही पैसे दिले तरच मतदान करायला घराबाहेर पडत आहे. त्या‍मुळे लहानांपासून मोठ्या पुढाऱ्यांना विकास कामाकडे बारकाईने लक्ष देऊन ते काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावे असे वाटत नाहीत. कारण विकास कामे नाही झाले तरी आपण पराभूत होऊ शकत नाही हे ठाऊक असल्याने ग्रीड योजनेच्या कामाला गती मिळत नाही, यामुळे शुद्ध पाणी मिळत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news