

लातूर : हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात लातूर शहर पोलिसांना यश आले आहे. एमआयडीसी, शिवाजीनगर आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणालीच्या (सीईआयआर) माध्यमातून ५१ हरवलेले मोबाईल शोधून काढले. आवश्यक पडताळणीनंतर हे मोबाईल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी सीईआयआर प्रणालीचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश येऊन एमआयडीसी पोलिसांनी १९, शिवाजीनगर पोलिसांनी २१ आणि विवेकानंद चौक पोलिसांनी ११ मोबाईल शोधून काढले.
शोध लागलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. आवश्यक कागदपत्रे व ओळख पटवून पडताळणी केल्यानंतर मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी लातूर शहर पोलिसांचे आभार मानले.
मोबाईल फोन हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. बँकिंग व्यवहार, शिक्षण, कार्यालयीन कामकाज, संपर्क आणि विविध ऑनलाइन सेवांसाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोबाईल हरवल्यास नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल शोधून परत केल्याने संबंधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चावरे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.