

Jalkot widowed female farmer news
जळकोट, पुढारी वृत्तसेवा शेती कामासाठी बैल नसल्याने आणि बैल घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने जळकोट शहरातील एक विधवा महिला शेतकरी आणि तिच्या मुलीसह स्वतःला औताला जुंपून शेती मशागत करण्याची परिस्थिती ओढावली असून त्यांचे वास्तव समाजमाध्यमांवरून झळकल्याने शासन प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. मुक्ताबाई दत्तात्रय कळसे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या जळकोटच्या रहिवासी आहेत.
मुक्ताबाई कळसे यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे मुक्ताबाईंवरच कुटुंबाची जबाबदारी आली आहे. मुक्ताबाईंना जळकोटच्या शिवारात अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत.
त्यामुळे मुक्ताबाई कळसे व लेक संध्या कळसे या मायलेकी मिळून औताचे ओझे खांद्यावर घेऊन कोळपणी करीत आहेत. मुक्ताबाई कळसे यांना संसारासह मुलीच्या लग्नाची चिंता आहे. पती आजारी पडल्याने त्यांच्यावर उपचार करताना आठ लाखांची उसनवारी कर्ज झाले आहे.
शेतीवर काढलेले सोसायटीचे ६० हजार रुपये कर्ज भरायचे आहे. पती हयात असताना दोन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले आहे. मुलगा कापड दुकानात नोकरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. मुक्ताबाईंकडे शेती मशागतीसाठी बैल नाहीत व ते विकत घेण्याची आर्थिक क्षमताही नाही त्यामुळे त्या आपल्या मुलीला सोबत घेऊन शेतात औत ओढत आहेत. त्यांची अशी कसरत पाहून गावकऱ्यांचे मन हेलावत आहे. मुक्ताबाईंना सरकारने योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.