

Nanded news
नायगाव : बाळासाहेब पांडे
गुरुवारी रात्री व दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने नायगाव तालुक्यात दहा विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अडकून हे सर्व विद्यार्थी हळदा व कोलंबी रस्त्यावरील नदीच्या पुरामध्ये तब्बल सात तास ट्रॅव्हल्समध्ये जीव मुठीत धरून बसले होते. अखेर पालक, नागेश महाराज हळदेकर, पंडित पाटील हाळदेकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने थरारक प्रयत्नांतून या लहान मुलांची सुटका करण्यात यश आले.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता हळदा (ता. कंधार) येथून हे विद्यार्थी शाळेसाठी निघाले. मात्र, कोलंबी जवळील पुलावरून जोरदार पाणी वाहू लागल्याने सचिन गोरे कोलंबीकर या ट्रॅव्हल्स चालकाने धोका टाळत गाडी थांबवली. परत हळदा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला असता, तो पर्यंत हळदा गावाजवळच्या दत्ता पाटील शिंदे यांच्या शेताजवळील नदीला पूर आल्याने दोन्ही बाजूने मार्ग बंद झाला. यामुळे चालकाने विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रॅव्हल्स कंधार व नायगाव तालुक्याच्या सीमेवर उंच टेकडीवर नेऊन उभी केली. दुपार उलटून गेली तरी काहीच उपाययोजना होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांनी आपले डबे काढून तेथेच जेवण उरकले. उपजिल्हाधिकारी मॅडम व प्रभारी गट शिक्षणाधिकारी सूर्यवंशी सर यांनी घटनास्थळी धाव घेतली तरी नदीच्या पलिकडे अडकल्याने मदत पोहोचू शकली नाही.
नदीच्या अलीकडील व पलीकडील दोन गाड्यांना रस्सी बांधून पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले. तब्बल सात तासानंतर सुटका करण्यात यश आले आणि जवळपास आठ तासांनी सर्व बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आपल्या लेकरांना सुखरूप पाहून पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.