

Umri Bolasa Railway Station Master Death
उमरी: उमरी तालुक्यातील बोळसा रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तर ओमप्रकाश शिवलाल मीना (वय 50) हे आपली ड्यूटी करून नेहमीच्या रस्त्याने दुचाकीवरून उमरीला घराकडे येत होते. मुसळधार पावसाने रस्त्यावरील नाल्यातील त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८) रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास घडली.
रात्री साडे दहा वाजले तरी पती घरी का आले नाहीत म्हणून त्याच्या पत्नीने संपर्क केला. परंतु नेटवर्क नसल्याने फोन लागला नाही. त्यानंतर पत्नीने बोळसा रेल्वेस्थानकावर फोन करून कर्मचाऱ्यांना पती घरी आले नाहीत. ते कोठे गेले आहेत याचा शोध घ्यायला सांगितले. शोध घेतला असता ओमप्रकाश मीना यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच निजामाबाद येथील नातेवाईक उमरीला आले. मीना राजस्थान येथील रहिवाशी असल्याने त्यांचा अंत्यविधी राजस्थानात करण्याचा निर्णय नातेवाईकांकडून घेण्यात आल्याचे रेल्वे पोलीस अधिकारी अनंता आघाव यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पत्नी आणि मुलगी उमरीला असतात. मुलगा शिक्षणासाठी आजी आजोबाकडे राजस्थानात राहतो. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.