

Jal Jivan works incomplete: Work delayed due to contractor's negligence
निवघा बाजार, पुढारी वृत्तसेवा : हदगाव तालुक्यातील निवघा बाजारसह परिसरातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल या उपक्रमांतर्गत गेल्या दोन तीन वर्षांपासून या नळ योजनेची कामे काही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना या योजनेच्या अस्ताव्यस्त पणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जल जीवन मिशन योजना राबविल्या जात आहे, याच धर्तीवर निवघा बाजारसह परिसरात प्रत्येक गावाला पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, पाण्यावाचून समाजातील कुठलाही घटक वंचित राहू न नये यासाठी या योजनेंतर्गत लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आणि सुरुवातीला वेगाने या कामाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर माशी कुठे शिंकली आणि या कामास कासव गती मिळाली काही कळेना. त्यामुळे कंपनीतर्फे दोन वर्षांत प्रत्येक नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या शक्यता या वल्गनाच ठरू पहात आहे, तर या संथगतीच्या कामामुळे जल जीवनच्या पाण्यावाचून नागरिक तहानलेलेच असल्याचे दिसून येत आहे.
पाणी मिळण्याची प्रतीक्षा?
नळ योजनेच्या पाईपलाईनसाठी जागोजागी चांगले रस्ते खोदून या रस्त्यांची चाळण झाल्यावरून नागरिकांनी या बाबीची ओरड सुरू केल्याने संबंधितांनी हे रस्ते थातूरमातूर पद्धतीने दुरुस्त करून दिले. मात्र ही योजना काही पूर्णत्वास गेली नसल्याने ही नळ योजना सुरू कधी होईल ? नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याची प्रतीक्षा कधी संपणार ? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.