Nanded BJP internal conflict : भाजपा प्रशिक्षण अभियानात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्षच वंचित!

प्रा.गणपत राऊत यांचे अमरनाथ राजुरकरांना खरमरीत पत्र
Nanded BJP internal conflict
भाजपाचे नांदेडमधील प्रशिक्षण अभियान अशा शाही व झगमगाटी वातावरणात संपन्न झाले.pudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड शहराच्या भाजपामध्ये काँग्रेसी पार्श्वभूमीचे नेते आणि त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर या पक्षाच्या जुन्या व निष्ठावान स्थानिक नेत्यांची अवहेलना होत असल्याच्या मुद्यावर माजी जिल्हाध्यक्ष प्रा.गणपत राऊत यांनी भाजपा महानगराध्यक्षांना खरमरीत पत्र पाठवून आपला राग व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड महानगर भाजपातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियान मोठा गाजावाजा करून पार पाडण्यात आले. त्याचे आयोजन करताना महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी जुन्या-नव्यांचा मेळ घातला. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व इतर जुन्या कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करून घेताना या अभियानातील 17 मे रोजीच्या एका सत्राचे अध्यक्षस्थान गणपत राऊत यांना देण्यात आले होते. कार्यक्रम पत्रिकेतही त्यांच्या नावाचा उल्लेख होता.

Nanded BJP internal conflict
Manoj Parab Goa News | आरजीप्रमुख मनोज परब यांचा राजकारण संन्यास

वरील दोन दिवसांचे अभियान वातानुकुलित सभागृह, आकर्षक व्यवस्था आणि दोन्ही दिवस शाही भोजन यामुळेच गाजले. पक्षनेते, खासदार अशोक चव्हाण हे या अभियानाचे उद्घाटक होते. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेेते बाळासाहेब पांडे यांना देण्यात आले होते.

त्याचदिवशीच्या सायंकाळच्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत घरातून निघालेल्या राऊत यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ‌‘तुम्ही येऊ नका‌’ असा निरोप दिला गेला आणि त्याचवेळी त्यांच्या अध्यक्षतेखालील सत्र दुसऱ्या दिवशी होईल, असे सांगितले गेले. तथापि दुसऱ्या दिवशी राऊत यांना घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही किंवा त्यांना कोणताही निरोप दिला गेला नाही त्यामुळे ते या अभियानापासून वंचित राहिले.

भाजपाची स्थापना 1980 साली झाल्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढील काळात महाराष्ट्राच्या दौऱ्यात नांदेड येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेच्या आयोजनात तसेच पक्षासाठी निधी संकलन करण्यात राऊत यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. वाजपेयी यांच्या सभेसाठी स्टेडियमचे मैदान मिळू नये, यासाठी तेव्हाच्याच काँग्रेस नेत्यांनी खोडा घातला होता.

Nanded BJP internal conflict
Sunetra Pawar: राष्ट्रवादीत पदावर नसतानाही निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार कोणी केला? सुनेत्रा पवारांनी दिला जोरदार दणका

पक्षातील राऊत यांच्या संदर्भातील वरील घडामोडींची माहिती कोणालाही कळाली नाही; पण गणपत राऊत यांनी 19 मे रोजी अमरनाथ राजूरकर यांना एक प्रदीर्घ पत्र पाठविले. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांस उमेदवारी द्यावी, अशी चर्चा येथे सुरू झालेली असतानाच राऊत यांचे वरील पत्र बाहेर आले.

पत्राची सुरुवात करताना त्यांनी अभ्यासवर्गाच्या आयोजनाबद्दल राजूरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या बाबतीत घडलेला संपूर्ण प्रकारही पत्रामध्ये नमूद केला. पक्षाचे सरचिटणीस विजय गंभीरे यांनी त्यांना 17 मेच्या सत्राबद्दल व या सत्राच्या अध्यक्षस्थानाबद्दल अवगत केले होते. त्यांना आणण्यासाठी एका कार्यकर्त्यास पाठविले गेले; पण ते घरातून निघाले असतानाच सत्र रद्द झाल्याचा निरोप देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्यांना कुणी निरोप दिला नाही किंवा त्यांची चौकशीही कुणी केली नाही.

याच पत्रात राऊत यांनी 1960 सालापासून आधी संघ मग जनसंघ आणि नंतर भाजपामधील आपल्या दीर्घकाळाच्या योगदानाची संपूर्ण माहिती दिली. पक्षासाठी वेगवेगळी आंदोलने करताना आम्ही पोलीस कोठडी आणि तुरुंगवासही भोगला, याकडे त्यांनी राजूरकरांचे लक्ष वेधले. पक्षाच्या कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मी सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली.

राऊत यांनी पाठविलेले पत्र प्राप्त झाल्यानंतर राजूरकर यांनी पुढे नेमके काय केले, ते समोर आलेले नाही; पण त्यांच्या बाबतीत घडलेल्या चुकीच्या व अपमानास्पद प्रकाराबद्दल पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.

टोकदार सवाल!

वरील अभियानातील एखाद्या सत्राचे अध्यक्ष मला करा, असे मी कोणाला म्हणालो नव्हतो. तुमच्याकडूनच निरोप आला म्हणून मी होकार कळवला. या बाबत तुमचे काय मत आहे? एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा आपण अपमान केला, असे आपणांस वाटत नाही काय? असा टोकदार सवाल राऊत यांनी या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news