

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील राजकीय वर्तुळाला गुरुवारी मोठा धक्का बसला. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाध्यक्षपद, पक्षाचे संस्थापक सदस्यत्व तसेच सक्रिय राजकारणाचा त्याग करत असल्याची धक्कादायक घोषणा केली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे खजिनदार अजय खोलकर आणि सरचिटणीस विश्वेश नाईक उपस्थित होते.
दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत मनोज परब यांचा संस्थापक अध्यक्ष व सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. दरम्यान, तत्पूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान मनोज परब यांनी अत्यंत भावनिक होत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. शेवटी राजीनाम्याची घोषणा करताच त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि सहकारीही भावुक झाले.
मनोज परब म्हणाले की, हा पक्ष आम्ही केवळ राजकीय उद्देशाने स्थापन केला नव्हता. प्रत्येक गोमंतकीयाचे जीवन अधिक चांगले व्हावे, या सामाजिक ध्येयातून पक्षाची निर्मिती झाली होती. परिणामी, २०२२ च्या निवडणुकीत आम्हाला १० टक्के मते मिळाली आणि तिथून आमचा राजकीय प्रवास सुरू झाला; मात्र कालांतराने पक्षात भीती, गटबाजी आणि सत्तेची लालसा वाढू लागली. ते पुढे म्हणाले, मी पक्षात अंतर्गत राजकारण, सत्तेचा हव्यास आणि व्यक्तीकेंद्री विचारसरणी वाढताना पाहिली,
तरीही माझ्या क्रांतिकारी तरुणांना वाचवण्यासाठी मी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले; पण अलीकडे ज्या युवकांना मी घडवले, ज्यांना मी 'रिव्होल्यूशनरी' म्हटले, तेच माझ्याविरोधात उभे राहून पक्ष ताब्यात घेण्यासाठी बैठका घेऊ लागले, ही सर्वात वेदनादायक बाब वाटली, ज्यामुळे मला खूप दुःख झाले.परब शेवटी म्हणाले की, या प्रवासात मी कधीही मतदारांचा अपमान केला नाही. माझा आक्रमकपणा फक्त विरोधक आणि फसव्या लोकप्रतिनिधींविरोधात होता.
या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे; पण आता हे सर्व सहन करण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळे पक्षाध्यक्ष, संस्थापक सदस्य आणि राजकीय कारकीर्द या सर्वांचा मी त्याग करत आहे. मनोज परब यांच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून आरजीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीं-वर आमदार वीरेश बोरकर अद्याप मौन बाळगून असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे. आता सर्वांचे लक्ष वीरेश बोरकर यांच्या प्रतिक्रियेकडे लागले आहे.
मला बोलणे भाग पडले
नेहमीच माझ्या रागीट स्वभावावर टीका केली गेली; मात्र पक्षातील निधी, युती किंवा इतर कोणत्याही निर्णयांवर सतत मलाच दोष दिला गेला. मी सर्व आरोप स्वीकारले; मात्र जेव्हा पक्षाचे नेतृत्व, मूल्ये आणि त्याग यांचा अपमान होऊ लागला, तेव्हा मला बोलणे भाग पडले, असेही परब यांनी सांगितले.
मी अध्यक्ष म्हणून अपयशी
मागील काही वर्षांपासून माझ्या डोळ्यासमोर हे अंतर्गत राजकारण सुरू होते. मात्र मी कारवाई केली नाही. कदाचित अध्यक्ष म्हणून मी कुठेतरी अपयशी ठरलो आहे. काही कठोर निर्णय आधीच घ्यायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.