

Insurance company refuses compensation in Ardhapur-Mudkhed area!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागांचे वादळीवाऱ्यांमुळे गेल्या महिन्यात मोठे नुकसान झाले; पण विमा कंपनीने तांत्रिक मुद्यावरून वरील भागातील बागायतदारांना भरपाई नाकारल्यामुळे निर्माण झालेला रोष पालकमंत्र्यांसह कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यापर्यंत व्यक्त झाल्यानंतर या प्रकरणात आता कृषिमंत्र्यांनी लक्ष घातले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात ९-१० जूनदरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह तडाखेबंद पाऊस झाल्यामुळे खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील केळीच्या बागा आणि इतर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वरील भागाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा आपल्या भाषणामध्ये मांडला; पण संबंधित विमा कंपनीने केलेल्या चलाखीची बाब बारड भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी थेट कृषिमंत्र्यांकडे मांडली. त्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. या विषयावर ते पुढील आठवड्यात संबंधितांची बैठक घेणार आहेत.
वरील तारखांदरम्यान नांदेड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. महसूल खात्यातर्फे नुकसानीचे पंचनामे झाले. अर्धापूर-मुदखेड या तालुक्यांमधील केळीच्या वागांचे सर्वाधिक नुकसान झाले, तरी संबंधित विमा कंपनीने केवळ निवघा, पिंपरखेड, तळणी (ता. हदगाव) दिग्रस आणि शेवडी (ता. कंधार लोहा) आणि चांडोळा ता. मुखेड या मंडळांमध्ये झालेले नुकसान मान्य केले.
९-१० जूनदरम्यान अर्धापूरच्या पलीकडे असलेल्या हदगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाऱ्याच्या वेगाची ताशी ६० ते ८० कि.मी. अशी नोंद झाली; पण अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे वाऱ्याचा वेग ताशी ३८ कि.मी. नोंदला गेला. या तांत्रिक मुद्द्यावरून विमा कंपनीने केळी बागांच्या नुकसान प्रकरणात पीकविमा नाकारला.
या प्रकरणात बारड येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख आणि याच पक्षाचे संदीपकुमार देशमुख यांनी १४ जून रोजीच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन दिले होते. अर्धापूर, मुदखेड भागातील स्वयंचलित हवामान स्थानकातील दोष पालकमंत्री सावे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. स्थानिक पातळीवर सर्व संबंधितांकडे तक्रार करूनही केळी बागायतदारांना भरपाई तर दूरच; पण दिलासाही मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष कृषिमंत्र्यांकडे होणार्या बैठकीकडे लागले आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आवश्यक ती माहिती घेतली आहे.